
Chhagan Bhujbal News: कांदा उत्पादकांना गुजरातमध्ये मदत, मग महाराष्ट्रात का नाही? : छगन भुजबळ
Nashik News : गुजरात राज्य सरकारने कांदा-बटाटा उत्पादकांसाठी मदत जाहीर केली. मग महाराष्ट्र सरकार कांदा उत्पादकांना मदत का करत नाही? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (ता. ८) विधानसभेत उपस्थित केला.
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची ग्वाही दिली. (Chhagan Bhujbal statement about Help to onion growers in Gujarat nashik news)
राज्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. एकीकडे होळी साजरी होत असताना शेतकऱ्यांच्या पिकांची होळी झाली. धुळवडीचे रंग खेळले जात असताना शेतकऱ्यांचे जीवन बेरंग झाले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणीही श्री. भुजबळ यांनी केली.
ते म्हणाले, की अवकाळी पावसाने द्राक्षांच्या बागा काही ठिकाणी जमीनदोस्त झाल्या. शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने बागा उभ्या कराव्या लागतील. असे द्राक्ष उत्पादक आता पाच वर्षे मागे गेले आहेत. कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला यांसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः आपले तोंड बडवून घेत आहे. आज महिला दिन साजरा होताना मायमाऊली अश्रू ढाळते.
कांदा उत्पादक अडचणीत आला असून, अद्याप शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही. नाफेड प्रत्यक्ष मार्केटमध्ये कांदा खरेदी न करता बाहेर कांदा खरेदी करत आहे.
परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने चक्क गाव विकायला काढले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक आहे, असेही त्यांनी सांगितले.