
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसपुढे कार्याध्यक्षपदाचा मुद्दा शून्य : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्धा डझन नेते आहेत. ते जबाबदारी सांभाळू शकतात. त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसपुढे कार्याध्यक्षपदाचा मुद्दा नाही, असा निर्वाळा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांच्या कार्याध्यक्षपदाच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. (Chhagan Bhujbal statement about ncp working nashik political news)
एका पक्षात एकमेकांविरोधात काही तरी सुरू असते. महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष असल्याने घर्षण होणार. मात्र विस्कळितपणा होणार नाही, याची काळजी वक्तव्य करताना नेत्यांनी घ्यायला हवी, असे सांगत श्री. भुजबळ यांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे असताना सरकार गेले असल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्वांनी शोध घ्यावा, असा टोला लगावला.
ते म्हणाले, की सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार हे जोपर्यंत एकत्रित आहेत, तोपर्यंत कोणी काहीही बोलले तरी त्याकडे लक्ष दिले जाऊ नये. कोणी मिठाचे खडे टाकू नयेत.
‘हनी-ट्रॅप'ची घ्यावी काळजी
‘हनी ट्रॅप'च्या कारवाईच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. भुजबळ म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कोणीही देशद्रोहाचा आरोप करता कामा नये. मात्र आपल्यातील कुणी चुकीचे वागत नाही ना याकडे संघाने नजर ठेवावी.
पोलिसांनी सतर्क राहावे. तसेच राष्ट्रविरोधी काम करणारे कोणीही असले, तरी कारवाई झाली पाहिजे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
राजकीय हेतूने भांडण
‘द केरला स्टोरी' चित्रपटाच्या अनुषंगाने हिंदू-मुस्लीम चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्मामध्ये भांडण लावून देत त्याचा फायदा राजकारणासाठी उठवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका करत असताना श्री. भुजबळ यांनी शाहीर साबळे हा चित्रपट मोफत दाखवायला हवा, असे सांगितले.
बागेश्वर बाबांच्या अनुषंगाने बोलताना श्री. भुजबळ यांनी संतांनी संतांसारखे वागावे असा सल्ला दिला. ते म्हणाले, की आमचे लोक बोगस मंडळींच्या मागे जातात. अंधश्रद्धेला बळ देण्याचे काम चालले आहे. त्यातून राज्यकर्त्यांच्या चुका लपल्या जातात.
त्यांचे काय ऐकता? शेतकऱ्यांना मदत, समृद्धी महामार्ग दुर्घटना, ऑइल कंपनीसाठी जागा याबद्दल भूमिका स्पष्ट करताना श्री. भुजबळ म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विधिमंडळ अधिवेशनात आम्ही चर्चा केली.
मात्र नुसती पाहणी चालली आहे. आता शेतकऱ्यांनी ठोस रक्कम मिळायला हवी. तसेच पूल कंत्राटदाराने सरकारकडे दिलेला नाही. त्यामुळे चूक झाल्याने आता स्वखर्चाने काम करून द्यायला हवे.
शिवाय ऑइल कंपनीमध्ये काम वाढवायचे असल्यास जागा लागतील. ज्या जागा शेतीसाठी उपयुक्त नाहीत, अशा जागा शोधाव्या लागतील.