Chhagan Bhujbal |लहान पक्षांच्या एकजुटीने 2024 चे चित्र बदलेल; शिवसेनेचा चेहरा..... : भुजबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 bhujbal-thakare

Chhagan Bhujbal |लहान पक्षांच्या एकजुटीने 2024 चे चित्र बदलेल; शिवसेनेचा चेहरा..... : भुजबळ

नाशिक : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना आणि त्यांचे चिन्ह काढून घेण्यात आले असले, तरी राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा (Shivsena) चेहरा उद्धव ठाकरे हेच आहेत. त्यामुळे लोकांना कळते, काय चालले आहे ते.

भाजपविरोधात लहान-लहान पक्ष एकत्र येत आहेत. (Chhagan Bhujbal statement about shiv sena party nashik news)

त्यासाठीच ठाकरे आणि केजरीवाल यांची भेट झाली असावी. अशारीतीने अनेक लहान पक्षांची एकजूट होऊन २०२४ चे चित्र बदलेल, अशी अपेक्षा असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राजकीय पातळीवर दोन दिवसांत घडलेल्या घडामोडींविषयी माजी मंत्री भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, की औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामाकरणाचा ठराव महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळाने केलाच होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तर पूर्वीपासून औरंगाबादचा उल्लेख जाहीर सभांमधून ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचा ‘धाराशिव’ असे करायचेच.

केंद्राने त्यास मंजुरी दिल्याने एकप्रकारे बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली आहे. बाँबेची मुंबई झाली तसेच औरंगाबादचे संभाजीनगर, असा सर्वसामान्यांकडूनही उललेख होऊ लागेल. या नामकरणाला काही पक्ष विरोध करीत असतील, तर आपल्याकडे लोकशाही आहे. त्यांना तो अधिकार आहे. परंतु नामकरण झालेले आहे. त्यामुळे त्यात काही बदल होण्याची आता शक्यता नाही.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

कांदाप्रश्‍नी ठोस भूमिकेचा अभाव

कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. अशावेळी राज्याच्या कृषिमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा करून आंतरराष्ट्रीय पातळीवर कांद्याचे एक्स्पोर्ट खुले करायला पाहिजे.

परंतु एकूणच ठोस भूमिकेचा अभाव असल्याने शेतीमालाविषयीचे प्रश्‍न गंभीर होत आहेत. नुकसानीच्या वेळी शेतकऱ्यांच्या बाजूने केंद्र शासनाने उभे न राहणे म्हणजे शेतकऱ्यांवरील अन्यायच असल्याची भूमिका श्री. भुजबळ यांनी मांडली.

‘तो’ तमाशा कशासाठी?

काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना विमानातून उतरवून अटक करण्याचा जो प्रकार भाजप सरकारने केला, त्यातून काय साध्य केले. उलट असा तमाशा करून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे.

यंत्रणांचा अशाप्रकारे वापर करण्याचा तमाशा पाहून नागरिकांना सारे समजते, असे म्हणत पुण्यातही पोलिसांच्या मदतीने भाजप पैसे वाटप करीत असतील, तर तेही गंभीरच आहे. आत्तापर्यंत सीबीआय, ईडी अशा यंत्रणांचा वापर केला जात होताच, आता पोलिसांचाही वापर होत असेल, तर ते गंभीरच आहे, असेही श्री. भुजबळ म्हणाले.