Chhagan Bhujbal : अजित पवारांशी मी मोठ्या आवाजात बोललो : छगन भुजबळ | chhagan bhujbal statement on obc reservation meeting with ajit pawar news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal : अजित पवारांशी मी मोठ्या आवाजात बोललो : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : अजित पवारांशी मी मोठ्या आवाजात बोललो : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी होऊन वादाची ठिणगी पडली, अशी चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. त्या संबंधाने शनिवारी (ता. ३०) भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्याशी मी मोठ्या आवाजात बोललो, असे सांगत भुजबळ यांनी हा वाद अथवा संघर्ष नाही. दोन भावांमध्ये जशी चर्चा होते तशी चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. पराचा कावळा करण्याचे कारण नसून, राईचा पर्वत केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

भुजबळ म्हणाले, की ओबीसी आरक्षणाबाबत बैठकीत गायकवाड आयोगाची आकडेवारी दिली. तसेच, सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या अनुशेषाकडे लक्ष वेधले. सचिवांनी काही माहिती नसल्याचे सांगितले. (chhagan bhujbal statement on obc reservation meeting with ajit pawar news)

त्यावर पवार यांनी अशी काही माहिती नाही, ती सत्य नाही, असे स्पष्ट केले. त्यावर तुमच्याकडे माहिती नाही, असे होऊ शकत नाही, असे मी सांगितले. त्यावर माझा मुद्दा थोड्या मोठ्या आवाजात मांडला. मात्र, आमच्यात मतभेद नाहीत. तो मुद्दा तिथंच संपला.

जातनिहाय जनगणनेची जुनी मागणी

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून गेल्या ३० वर्षांपासून जातनिहाय जनगणना करण्यात येत आहे. वेगवेगळ्या राज्यांतून ही मागणी केली. बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचे काम पूर्ण होत आले आहे. ज्या राज्यांना वाटते, त्यांनी जातनिहाय जनगणना केली आहे.

त्यातून ओबीसींचे नेमके प्रमाण समजण्यास मदत होईल, असे सांगून पैसे देऊन ओबीसींमध्ये नोंदी केल्या जात आहेत, या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, की सरकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. चुकीच्या नोंदी करून लोकप्रतिनिधी झाले. त्यासंबंधाने न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. प्रत्येकाच्या विरोधात न्यायालयात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे चुकीचे प्रमाणपत्र कोणालाही दिले जाऊ नये. सरकारने त्याकडे लक्ष द्यावे.

शरद पवारांनी सांगावे

भुजबळ यांनी तुरुंगात असताना शरद पवार यांना ‘ब्लॅकमेल’ केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. त्यास उत्तर देताना भुजबळ म्हणाले, की मी कशाला ‘ब्लॅकमेल’ करणार आहे? केले असल्यास ते शरद पवार यांनी सांगावे.

रुग्णालयात जाऊन कागदपत्रे तपासून घ्यावीत. आपण वरिष्ठ आणि कुटुंबीयांना मदत मागत असतो. त्यात चुकीचे काय आहे?

छगन भुजबळ म्हणाले...

० एक-दोन आमदार फुटल्याने चिन्ह जात नाही. इथे ४३ महाराष्ट्राचे, नागालँड आणि झारखंडचे आमदार आहेत

० ‘घड्याळ’ चिन्ह गोठविले जाईल, अशी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. जयंत पाटील यांनी पक्ष फुटला नाही, असे म्हटले. पक्षाचे चिन्ह आणि सगळ्या गोष्टी आमच्याकडे राहतील

० उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यस्त होते. मुख्यमंत्र्यांकडे गर्दी होती. त्यामुळे उशीर झाल्याने ते मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणेशोत्सवासाठी गेले नाहीत. याबाबत वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही

० माझं काम मी केलं आहे. केंद्र सरकारशी बोलणे झाले. कांदा व्यापाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी

० लोकसभा आणि विधानसभेत बहुमत असावे, अशी प्रत्येक पक्षाची इच्छा असते. निवडून येतील अशांना रिंगणात उतरविले जाते. निवडणुकीवेळी मंत्र्यांना निवडणूक लढविण्याचा निर्णय सर्व पक्ष घेतील