Chhagan Bhujbal | ‘ते’ मोदी आणि ओबीसींचा संबंधच नाही : छगन भुजबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal statement regarding rahul gandhi disqualification

Chhagan Bhujbal | ‘ते’ मोदी आणि ओबीसींचा संबंधच नाही : छगन भुजबळ

नाशिक : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उल्लेख केलेले मोदी आणि ओबीसी यांचा काडीचाही संबंध नाही. देशात विविध धर्मांचे मोदी आहेत. त्यामुळे ओबीसींचा अवमान झालेला नसून भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा खेळलेला डाव त्यांच्या अंगलट होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. २६) येथे पत्रकारांशी बोलताना केला.

श्री. गांधी यांना देशभर सहानुभूती मिळत असल्याचे त्यांनी म्हटले. (Chhagan Bhujbal statement regarding rahul gandhi disqualification nashik news)

श्री. भुजबळ म्हणाले, की राहुल गांधी आणि अदानी प्रकरणाशी ओबीसीचा संबंध नाही. भाजपची राजकीय चाल चुकली आहे. देशातील विरोधी पक्ष श्री. गांधी यांना पाठिंबा देत आहे. राजकीय नेते भाषणात अनेकदा काही बोलतात. राहुल गांधी यांनी उल्लेख केलेले दोन ते चार लोक मोदी आहेत, हे खरे आहे. अनेक मोदी राजकारणात होते. त्यामुळे मोदी आडनाव म्हणजे ओबीसी असे होत नसल्याने सर्व ओबीसींनी नाराज व्हावे, असे नाही.

जनतेचं न्यायालय मोठं

श्री. गांधी यांनी उल्लेख केलेले ‘ते’ मोदी काही हजार कोटी रुपये घेऊन देश सोडून गेले. त्यावर कोणी काही बोलायचे नाही का? ते बोलले असतील, त्यातून ताबडतोब न्यायालयात जायचे?. नाशिकमध्ये भद्रकालीत एखादी घटना घडल्यास अंबड पोलिस तक्रार घेत नाहीत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

भद्रकाली पोलिसांकडे जायला सांगतात. हे पाहता, कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेचे प्रकरण सुरतमध्ये दाखल केले. एक न्यायाधीश आले आणि त्यांनी निकाल दिला व श्री. गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की जनतेचे न्यायालय मोठं आहे.

दिवंगत इंदिरा गांधी यांना मोरारजी देसाई यांच्या काळात असा त्रास देण्यात आला. अटक झाली. मात्र त्यानंतर पुन्हा जनतेने इंदिरा गांधींना सर्वाधिक मतांनी निवडून दिले. म्हणून कुणाला वाटत असेल, की राहुल गांधी यांचे तोंड बंद करा, तर हे जनतेला आवडणार नाही.

विचारवंत श्री. गांधी यांच्या बाजूने मत व्यक्त करत आहेत. मुळातच, ब्रिटिश विरोधात असलेले महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आदींना नमवू शकलेले नाहीत, हे ध्यानात घ्यायला हवे.