
Nashik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गिरवलेय ‘मुक्त’ तून धडे
नाशिक : गेल्या दहा दिवसांपासून राज्यासह राष्ट्रीय राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath shinde) चर्चेचा विषय ठरले. गुरुवारी (ता.३०) त्यांनी मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. यापुढील काळात राज्याच्या कारभाराची धुरा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शैक्षणिक वाटचालीला यानिमित्त उजाळा दिला जातो आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून (YCMOU) कला शाखेतील पदवी अभ्यासक्रमासह अन्य दोन शिक्षणक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहे. (Chief Minister Eknath Shinde Studied from YCMOU Nashik News)
बीएसह मास कम्युनिकेशन, ह्यूमन राईट्स शिक्षणक्रम पूर्ण
विद्यापीठाच्या ठाणे येथील ज्ञानपीठ अभ्यास केंद्रातून त्यांनी बी.ए. ही कला शाखेतील पदवी अभ्यासक्रम मे २०२० मध्ये पूर्ण केला आहे. तर डिप्लोमा इन जर्नालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशन हा शिक्षणक्रम ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्ण केला. मानवी हक्क प्रमाणपत्र (सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन राईट्स) हा शिक्षणक्रमदेखील त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केलेला आहे.
व्हर्च्युअल पद्धतीने नोंदविला होता दीक्षांत समारंभात सहभाग
कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण शैक्षणिक व्यवस्था प्रभावित झालेली होती. शिक्षण ऑनलाइन माध्यमातून सुरु होते. अशात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २६ वा दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने पार पडला होता. २ मार्च २०२१ ला झालेल्या या समारंभात मिक्स रिॲलिटी या वास्तव-आभासी तंत्रज्ञानाद्वारे गुणवंतांना पदक प्रदान केले होते. या समारंभात तत्कालीन नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना पदवी प्रदान केली होती. व्हर्च्युअल पद्धतीने अवतरतांना त्यांनी पदवी प्रमाणपत्र स्वीकारले होते.
हेही वाचा: 55 हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
"यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पदवीधर आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे दोन शिक्षणक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले श्री. शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचा विद्याशाखा आणि विद्यापीठाला आनंद झाला आहे. आमचे विद्यार्थी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे." -प्रा.डॉ. प्रवीण घोडेस्वार, संचालक, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ.
हेही वाचा: सूर्योदय हॉस्पिटलच्या जनरेटर रूमला आग
Web Title: Chief Minister Eknath Shinde Studied From Ycmou Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..