Child Health Checkup : राज्यात 3 कोटी बालकांची आरोग्य तपासणी; या वयोगटांवर असणार फोकस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Health

Child Health Checkup : राज्यात 3 कोटी बालकांची आरोग्य तपासणी; या वयोगटांवर असणार फोकस

नामपूर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालकांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शून्य ते अठरा वयोगटांतील बालके, किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य तपासणी राज्यभर राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे १८ वर्षांखालील जवळपास दोन कोटी ९२ लाख मुलांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत बालकांच्या तपासणीसाठी स्थानिक पातळीवर बालआरोग्य तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे. नऊ हजार तपासणी पथकांमार्फत ही अभिनव योजना राबविली जात आहे. या अभियानात सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या बालकांची तपासणी करून आपण जागरूक पालक असल्याचे दाखवून द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राज्यातील ० ते १८ वर्षांपर्यंतची बालके, तसेच किशोरवर्यीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

आरोग्य तपासणीत आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू व आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे, राज्यातील शाळा अंगणवाडी, शासकीय व निमशासकीय शाळा, खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, बालगृहे, अनाथालये, अंध, दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांसह शाळाबाह्य विद्यार्थ्यांची तपासणी या मोहिमेंतर्गत होणार आहे.

शासकीय, निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, खासगी शाळा, आश्रमशाळा, अंधशाळा, दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, खासगी नर्सरी, बालवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथआश्रम, समाजकल्याण व आदिवासी विभाग वसतिगृहे येथील विद्यार्थ्यांना मोहिमेचा लाभ होईल.

सदर पथकामार्फत प्रतिदिन १५० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. शासकीय व खासगी शाळा, अंगणवाडी यांच्या तपासणीचा कृतिआराखडा तयार करण्यात येणार आहे. ही पथके कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व अंगणवाडीला दररोज भेटी देणार असून, तपासणीनंतर आवश्यकतेनुसार बालकांना प्रथम, द्वितीय, तृतीय स्तरावर उपचाराकरिता संदर्भित करणार आहेत.

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र/प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपग्रामीण रुग्णालये, सीएचसी, महापालिका रुग्णालये, प्रसूतिगृहांमध्येही प्रथमस्तर तपासणी होणार आहे. याअंतर्गत प्रा. आ. केंद्रामध्ये, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय/ उपजिल्हा रुग्णालये/सामुदायिक आरोग्य केंद्रे/महापालिका रुग्णालये/प्रसूतिगृहे येथे आठवड्यातून दोन वेळा तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देणार आहे.

अशी होणार तपासणी

* डोक्यापासून ते पायापर्यंत सविस्तर तपासणी करून वजन, उंची घेऊन सॅम/मॅम/बीएमआय काढणे

* गरजेनुसार विद्यार्थ्यांचे रक्तदाब, तापमान मोजणे, त्वरित उपचार, संदर्भित करणे

* नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, तसेच रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी आदी आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित संदर्भित करणे

* ऑटीझम, विकासात्मक विलंब, शिकण्याची अक्षमताच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित डीईआयसी येथे संदर्भित करणे

* किशोरवयीन मुला-मुलींमधील शारीरिक/मानसिक आजार शोधून त्यांना आवश्यकतेनुसार संदर्भित करावे

* प्रत्येक आजारी बालकांची रक्त-लघवी-थुंकी, एक्सरे/यूएसजी आदी तपासण्या आवश्यकतेनुसार तपासणी करणे

टॅग्स :Nashikchild healthhealth