Nashik News : वडील रागावल्याने चिमुकल्यांनी घर सोडले! सतर्क चेहडी ग्रामस्थांनी केले पालकांच्या स्वाधीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children with parents

Nashik News : वडील रागावल्याने चिमुकल्यांनी घर सोडले! सतर्क चेहडी ग्रामस्थांनी केले पालकांच्या स्वाधीन

चांदोरी (जि. नाशिक) : रविवारी (ता. १२) दुपारी एकच्या सुमारास वडील रागावल्याने घरातून बाहेर पडलेले एक मुलगा अन्‌ एक मुलगी असे दोन चिमुरडे सायखेडा पोलिस आणि चेहडी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे नातेवाइकांच्या ताब्यात सुखरूप परतले. (Children left home because their father got angry alert villagers handed over to parents Nashik News)

या निमित्ताने पोलिसांनी दाखवलेली कर्तव्यदक्षता व माणुसकी समाजापुढे आली आहे. याबाबत माहिती अशी, की हिरावाडी येथील खुशी उर्फ धनश्री रमेश सातपुते व आयुष दीपक साबळे या दहा वर्षीय चिमुरड्यांना तीन दिवसांपूर्वी आयुषचे वडील रागावले होते.

त्यामुळे हिरमुसलेले हे दोघे अचानकपणे घर सोडून निघून गेले. नांदूरनाका, माडसांगवी, शिलापूरमार्गे जात असताना हे दोघेही रस्तातील दुभाजकावरून धोकादायक पद्धतीने पायी चालत होते. भुकेले असल्यामुळे त्यांना आपण कुठे जात आहोत, याचेही भान नव्हते. मात्र ते सतत चालत होते.

या दरम्यान चेहडी येथील ग्रामस्थांना ते दोघे भेदरलेल्या स्थितीत चालत जात असताना दिसले. ग्रामस्थांनी तातडीने त्यांची चौकशी करत जवळ घेतले व गाडीत बसवून सायखेडा पोलीस ठाण्यात आणले. तेथे खाऊ घातल्यानंतर विश्‍वासात घेत त्यांची माहिती घेतली व जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांना याबाबत कल्पना दिली.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

तोपर्यंत दोघांचेही पालक पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहचले होते. त्यांना सायखेडा येथे पाचारण करून दोन्ही बालकांना सुखरूपपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

सहायक पोलिस निरीक्षक पी. वाय. कादरी, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, पोलीस हवालदार भगवान कर्डक, महिला पोलीस नाईक सुनिता बोडके, पोलीस कॉन्स्टेबल संदिप शेवाळे, मदन कहांडळ यांनी ही कामगिरी बजावल्याबद्दल परिसरातील नागरिक व मुलांच्या नातेवाइकांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.