
Nashik News : नाशिकवेसतील वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त; अतिक्रमण डोकेदुखी
सिन्नर (जि. नाशिक) : येथील नाशिकवेस परिसरातील भाजी बाजारात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील अतिक्रमण तसेच रस्त्यावरच ठाण मांडून बसणारे भाजीपाला, फळ व पथविक्रेत्यांमुळे येथील कोंडी सुटण्याचे नाव घेत नाही.
परिसरातील रहिवासीयांनी व व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेला निवेदने दिलेली आहेत प्रशासन लवकरात लवकर वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी व्यावसायिक करत आहे. (Citizens suffer from traffic congestion in Nashik headache for public Nashik News)
समस्या नित्याचीच
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणांमध्ये नाशिकवेस परिसर मोडत असल्याने येथील रस्त्यांवर नेहमीच वर्दळ असते. परिसरातील रहिवासी व व्यापाऱ्यांचीही वाहने येथूनच जात असतात. सरदवाडी रोड परिसरातील उपनगरांतील नागरिकांना शहरात येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने कामानिमित्त शहरात येण्यासाठी याच रस्त्याचा जादा वापर होत असतो.
त्यात नाशिकवेसकडून गंगावेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजीबाजार भरत असल्याने खरेदीसाठीही येथे दररोजच गर्दी होत असते. मात्र, सरस्वती नदीच्या पुलापासून तर नाशिकवेस येथील भगत सन्स परिसरापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे.
नाशिकवेसच्या प्रवेशद्वारावरच्या दुतर्फा भाजीविक्रेते बसत असल्याने अर्धा रस्ताच हे विक्रेते व्यापून घेतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत असते. त्यासाठी काही दिवसांपूर्वी परिसरातील काही व्यापारी व रहिवासीयांनी नगरपरिषदेला निवेदन देत रस्त्याच्या दुतर्फा बसत असलेल्या विक्रेत्यांना हटवून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

रुग्णवाहिकेसाठीही रस्ता अडचणीचा
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस स्टॅन्ड तसेच, नाशिक वेस गंगावेस लाल चौक आदी या भागात अनेक दुचाकी ,चारचाकी वाहने रस्त्यातच लावल्याने अनेक नागरिकांना या वाहतूक कोंडीतून रोज मार्गक्रमण करावे लागते.
त्यातच दिवसातून एक दोन किरकोळ वाद वगळता येथे सतत रस्त्यावर वाहन लावून अनेक जण गप्पा मारण्यात धन्यता मानतात रुग्णवाहिकेतून पेशंट शहराबाहेर नेण्याचे या रस्त्याने ठरले तर रुग्णवाहिकेला रस्ता पार करण्यासाठी सामना करावा लागतो.
दुहेरी वाहतूक प्रस्ताव
बस स्थानक ते नवापूल, नवापूल ते खासदार पूल, लाल चौक ते वाववेस, गावठा ते नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वावीवेस, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तानाजी चौक या मार्गावर एकेरी वाहतूक तर वावीवेस ते पोस्ट मार्ग नाशिक वेस आणि वावी वेस ते पडकी वेस मार्गे गाव या दोन मार्गावर दुहेरी वाहतूक प्रस्ताव आहे. त्यावर संबंधित प्रशासन कधी निर्णय घेते यावर लक्ष लागून आहे.