Shiv Jayanti 2023 : शिवजन्मोत्सवासाठी शहर परिसर सजला; नानाविध उपक्रम
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी शहर परिसर सजला आहे. भगवे ध्वज, स्वागत कमानी मिरवणुका या पारंपरिक प्रथेशिवाय नाशिकला
दरवेळी विशिष्ट संकल्पना राबवीत शिवजन्मोत्सव (Shiva Janmotsav) साजरा होतो. (City area decoration for Shiva Janmotsav Image worship will be held at more than 350 places nashik news)
राज्यभर नाशिकच्या जन्मोत्सवाची दखल घेतली जाते. त्याच धर्तीवर यंदा सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह शिवप्रेमीनी नानाविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. शहरात साधारण ३५० ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात शिवपूजन होणार आहे.
भद्रकाली आणि नाशिक रोडला प्रत्येकी सहा चित्ररथाचा समावेश असलेल्या याप्रमाणे दोन भव्य मिरवणुका होतील. रोषणाई, शिव कार्याची महती सांगणारे देखावे, अभूतपूर्व स्वरूपाच्या संकल्पनेतून छत्रपतींना अभिवादन केले जाणार आहे. नाशिक रोडला किल्ले रायगड आणि शिवनेरीचा देखावा आहे.
नाशिकला २१ फुटाची कवड्यांची माळ, अशोक स्तंभावर ६५ फुटांची शिवप्रतिकृती, मराठा साम्राज्याचे आरमार आणि दीडशेहून अधिक मंडळानी एकत्र येऊन काढणार असलेली शिवसंकल्प पालखी या आणि अशा अनेक वैशिष्ट्यांनी यंदा शिवछत्रपतींना अभिवादन केले जाणार आहे.
इतिहासकालीन आरमाराचा देखावा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्रात मराठ्यांचे साम्राज्य उभे करण्यासाठी बोट बांधणीचा कारखानादेखील काढला होता. त्या काळी भिवंडीजवळ स्वराज्याचे आरमार उभारले जात होते. शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिरावाडीतील कमलनगर चौक येथे या आरमारची भव्य प्रतिकृती साकारली जात आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
यंदाच्या देखाव्याचे विशेष महत्त्व म्हणजे, राज्य सरकार भिवंडी येथे या आरमारचे संग्रहालय साकारणार आहे. हे संग्रहालय उभारण्याआधी या आरमाराचा देखावा पाहायला मिळणार आहे. या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींना हा देखावा पायी फिरून जवळून बघायला मिळणार आहे.
शिवजन्मोत्सव समितीतर्फे शिवसंकल्प
जुने नाशिक परिसरातील सुमारे १५४ सांस्कृतिक मित्रमंडळांनी एकत्र येत शिवसंकल्प पालखीचा उपक्रम हाती घेतला आहे. नानावली येथील स्वयंभू सिद्धेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करीत
स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ एप्रिल १६४५ ला रायरेश्वराला रक्ताने अभिषेक करून संकल्प केला. त्याच न्यायाने जुने नाशिक भागातील १५४ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंभू सिद्धेश्वर महादेव मंदिरात एकत्र येऊन शिवपालखीचा उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे.
किल्ले रायगड आणि शिवनेरीचे दर्शन
नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रायगड किल्ल्याची, तर जेल रोडला शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती आणि शिवमंच असेल. शिवजन्मोत्सव समितीतर्फे शहरातील मुख्य रस्ते, चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलासह संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. स्वागत कमानी, होर्डिंग, पताका, विद्युत रोषणाई करण्यात आली.
महात्मा गांधी रोड, बिटको चौक, जेल रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, देवळाली गाव, विहीतगाव, सिन्नर फाटा, चेहेडी, शिंदे, पळसे, सामनगाव, कोटमगाव, एकलहरे आदी भागात विविध कार्यक्रमांचे तसेच शिवाजी पुतळ्याजवळ विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे शनिवारी (ता. १८)सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, रविवारी (ता. १९) सकाळी आठला शिवपूजन, अभिषेक, पुतळा पूजन तसेच सायंकाळी तीनपर्यंत रक्तदान शिबिर, सायंकाळी पाचला मिरवणुक, तर बुधवारी हभप निवृत्ती महाराज यांचे कीर्तन, गुरुवार जागर मराठी मनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.