Nashik: शहरातील पुलांना समस्यांचे ग्रहण; वाढत्या अतिक्रमणाने वाहतूक कोंडी! मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष | City bridges beset with problems Traffic congestion with increasing encroachment Neglect of municipal administration Nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic jam on Ramsetu bridge in Malegaon city

Nashik: शहरातील पुलांना समस्यांचे ग्रहण; वाढत्या अतिक्रमणाने वाहतूक कोंडी! मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

Nashik : मालेगाव शहरातील मध्यवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोसम नदीवरील पुलांची अवस्था अनेक वर्षांपासून दयनीय झाली आहे. मोसम नदीवरील या पुलांना कुठे खड्डे पडली तर कुठे चिखल मातीचे लोळ दिसत आहेत.

शहरातील रामसेतू तसेच आंबेडकर पुलावर सर्रासपणे वाहनांची पार्किंग होत असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील सर्व पूल समस्यांनी वेढले असून शहरवासीयांना पुलावरून वाटचाल करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. (City bridges beset with problems Traffic congestion with increasing encroachment Neglect of municipal administration Nashik news)

शहरातील मध्यवर्ती आंबेडकर पुलावर चारा विक्रेत्यांनी आपली दुकाने मांडल्याने पुलावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मालेगावचे पूल सध्या छोट्या विक्रेत्यांनी व्यापले आहेत. काट्या मारुती ते कॅम्प बंधारा असे दहा पूल मालेगाव शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडतात.

या पुलावरून शहरातील नागरिक, विद्यार्थी ये-जा करतात. हे पूल म्हणजे पूर्व व पश्चिम भागाचा दुवा आहेत. शहरातील बहुतांश फळ विक्रेत्यांनी जागेचा प्रश्न पुलांच्या माध्यमातून सोडविला. सांडवा पुलावर पूर्वीपासूनच विविध वस्तू विक्रेत्यांनी ठाण मांडले होते. सांडवा पूल पादचाऱ्यांसाठीच आहे. यातून नागरिक, महिला भाजीबाजारातून कशीबशी वाट काढून ये-जा करतात.

यानंतर रामसेतू पुलाची उभारणी झाली. या भव्य व रुंद पुलाचा वापर मालेगावकरांकडून सर्रास वाहने पार्किंगसाठी होऊ लागला आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा जटिल प्रश्‍न याठिकाणी कायम तयार होत आहे.

रामसेतू व आंबेडकर पुलावर मोकाट जनावरांचा सकाळपासून ठिय्या असतो. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो. मोकाट जनावरांमुळे अनेकवेळा अपघातही होतात. या प्रश्‍नावर विविध संस्था, सामाजिक संघटनांनी वारंवार आंदोलने केली.

मात्र प्रशासनाने उपाययोजना केल्या नाहीत. पुलांची संख्या वाढली असली तरी या पुलांचा मुक्तपणे वापर करण्यात अडचणींचा डोंगर आडवा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मोसम नदीवर असलेली पूल

- मोसम पूल

- रामसेतू पूल

- आंबेडकर पूल

- अल्लम्मा पूल

"मोसम नदीवर असलेल्या पुलांवरील अतिक्रमणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून आहे. याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रोजच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. फळविक्रेते, चारा विक्रेते, वाहनांची पार्किंग यामुळे सदरचे पूल वाहतुकीसाठी बनविले आहे की यांच्यासाठी ? असा प्रश्न नागरिकांना पडतो. त्यामुळे शहरातील या समस्यांकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे." - जितेंद्र देसले, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

"शहरातील पुलावर वाहनांची पार्किंग होत असते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचाच आहे. पुलावर विक्रेत्यांमुळे अतिक्रमण होते. त्यामुळे पूल अरुंद होऊन वाहतूक कोंडी होते. सायंकाळी व बाजाराच्या दिवसही पुलांवरून चालण्यासाठी जागा उरत नाही. मनपा प्रशासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे." - नेविलकुमार तिवारी, सामाजिक कार्यकर्ते