
NMC Water Management: शनिवारी शहराचा पाणी पुरवठा बंद! अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी कपातीचेही नियोजन
Water Supply Management : दक्षिण प्रशांत महासागरात अल नीनो वादळ निर्माण होऊन पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने महापालिकेकडून पाणी टंचाईचा कृती आराखडा विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला.
त्यामुळे पाणी कपात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच, येत्या शनिवारी (ता. २९) पाणीपुरवठा विभागाकडून वीज वितरण कंपनीचे शटडाऊन लक्षात घेता संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (City water supply off on Saturday Water reduction planned in wake of El Nino by nmc water supply department nashik news)
अल निनो वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत.
त्यानुसार महापालिकेने एप्रिल व मेमध्ये आठवड्यातून एक दिवस, तर पुढे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आढावा घेऊन जून व जुलै महिन्यात आठवड्यातून दोन वेळेस पाणी कपातीचे नियोजन केले आहे.
त्या संदर्भातील अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे त्यावर निर्णय घेतील.
दरम्यान, अद्याप पाणी कपातीवर निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु, महापालिकेने पाणी वाचविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्पष्ट सूचना नसल्या, तरीही वीज वितरण कंपनीचे शट डाऊन लक्षात घेऊन शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
गंगापूर, दारणा व मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनवर पावसाळापूर्व कामे करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेला पत्र पाठवून दिवसभर वीज पुरवठा बंद राहील, अशा सूचना दिल्या.
त्याच आधारे महापालिकेनेही शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अधिकृत सूचना नसली, तरी वीज वितरण कंपनीने कामांची सुचना महापालिकेला दिली आहे. त्यामुळे शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार असून, रविवारीही (ता. ३०) त्याचा परिणाम होणार आहे.