
Citylinc Meeting : तोटा कमी करण्यासाठी शाळांच्या बस फेऱ्यांमध्ये कपात
Citylinc Meeting : महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या माध्यमातून तोटा कमी करण्यासाठी शाळांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात बरोबरच धार्मिक पर्यटनाला भेटी देणाऱ्या मार्गांवर फेऱ्या वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (Citylinc Meeting Reduction in school bus trips to reduce losses nashik news)
महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली सिटीलिंक बससेवेचा तोटा वाढत आहे. सिटीलिंक कंपनीच्या त्रैमासिक बैठकीमध्ये तोटा कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. एप्रिल महिन्यात शाळांना सुटी लागल्या आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी कमी झाल्याने शाळांच्या मार्गावर असलेल्या बस फेऱ्यांची संख्या कमी केली जाणार आहे. सुटीमुळे धार्मिक पर्यटनात वाढ झाली आहे. त्यामुळे ज्या भागात अधिक भाविक जातात, त्या मार्गांवर बसच्या फेऱ्या निश्चित केल्या जाणार आहे.
सिटीलिंक कंपनीच्या सेवेत मागील काही महिन्यात दोनदा वाहकांनी संप पुकारला. त्यामुळे बससेवा ठप्प झाली. वाहक व चालकांच्या संपामुळे बससेवा ठप्प होऊ नये यासाठी आता वाहक पुरविणाऱ्या दोन संस्थांची नियुक्ती केली जाणार आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सध्या दिल्लीच्या मॅक्स डिटेक्टिव्ह कंपनीमार्फत वाहक सेवा दिली जाते . दोनशे वाहक पुरविणारे नवी संस्था नियुक्त केली जाणार आहे त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. क्लीन एअर प्रोग्रॅम अंतर्गत ५० इलेक्ट्रिकल बस खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे.
त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आले असून, १५ मेस निविदांची नोंदणी व १६ मेस टेक्निकल बीड ओपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके, लेखाधिकारी नरेंद्र महाजन, शहर अभियंता शिवकुमार वंजारी आदी बैठकीला उपस्थित होते.