MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून राज्‍यसेवा 2021 ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून राज्‍यसेवा 2021 ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध!

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ (Main Exam 2021) याकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. (Civil Service Merit List 2021 published by Public Service Commission nashik news)

मार्चच्‍या दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रशासकीय प्रक्रिया चालणार असून, यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल. त्‍यामुळे प्रशासकीय सेवेत लवकरच कर्तव्‍यदक्ष अधिकारी दाखल होणार आहेत.

कोरोना महामारीमुळे स्‍पर्धा परीक्षांची प्रक्रिया प्रभावित झालेली होती. त्‍यामुळे परीक्षा झालेल्‍या असताना निकालाची प्रतीक्षा उमेदवारांना करावी लागत होती. त्‍यातच आयोगाने घेतलेल्‍या राज्‍य सेवा मुख्य परीक्षा २०२१ साठी गुणवत्ता यादी आयोगाने मंगळवारी (ता.२८) जारी केली आहे.

या यादीत उमेदवारांना संवर्गाचे पसंतीक्रम सादर करायचे असून, त्‍यासाठी ३ ते १० मार्च असा कालावधी उपलब्‍ध करून दिला जाणार आहे. प्रसिद्ध केलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाची असून विविध दाव्यांबाबत अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणीतून काही उमेदवारांच्या दाव्यांत बदल होण्याची शक्‍यता आयोगाने व्‍यक्‍त केलेली आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

यातून उमेदवाराचा गुणवत्ताक्रम बदलण्याचीही शक्‍यतेसह उमेदवार अपात्र ठरू शकतो, अशी शक्‍यतादेखील वर्तविलेली आहे. न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून ही यादी प्रसिद्ध केली असल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.

परीक्षेच्या अधिसूचित संवर्ग, पदासाठी पसंतीक्रम विकल्प सादर करण्यासाठी https://mpsc.gov.in येथे वेबलिंक उपलब्‍ध राहणार असून, त्‍यासाठी १० मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे १० मार्चनंतर निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

उमेदवारांवर शुभेच्‍छांचा वर्षाव

गुणवत्ता यादीत स्‍थान मिळविण्यात नाशिकचेही अनेक उमेदवार यशस्‍वी झालेले आहेत. सध्या अंतिम निकाल जाहीर झालेला नसला, तरी यशस्‍वी उमेदवारांवर मित्र -परिवार, आप्तस्‍वकीयांकडून शुभेच्‍छांचा वर्षाव सुरु झालेला होता. विशेषतः सोशल मिडीयावर पोस्‍ट शेअर करत शुभेच्‍छा व्‍यक्‍त केल्‍या जात होत्‍या.