Nashik Crime News : शाळा महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये राडा; विद्यार्थ्यांवर हत्याराने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Nashik Crime News : शाळा महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये राडा; विद्यार्थ्यांवर हत्याराने वार

नाशिक : शहरातील गंगापूर रोड परिसरातील नामांकित महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यावर हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे.

तर म्हसरूळ परिसरातील शाळेच्या बाहेर विद्यार्थ्याला टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली. (clashes and stabbing in school college campus nashik crime news)

शहरात कोयतेधारी टोळक्यांकडून परिसरात दहशत माजवून प्राणघातक हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत असताना, शाळा-महाविद्यालयांपर्यंत जीवघेण्या हाणामारीचे प्रकार पोचले आहेत. एकापाठोपाठ एक गुन्हेगारी घटनांनी शहर हादरले असताना, शाळा-महाविद्यालयांतही राडे होऊ लागल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

विद्यार्थी करण वाळू खांडबहाले (वय १९, रा. खर्जुल मळा, सिन्नर फाटा) याच्या फिर्यादीनुसार, तो गंगापूर रोडवरील नामांकित महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. शनिवारी (ता. २५) दुपारी बाराच्या सुमारास जेहान सर्कलजवळील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोघा संशयितांनी करणवर अचानक हल्ला चढविला.

एकाने करणच्या डोक्यात दगड मारला, तर दुसऱ्याने त्याच्याकडील काहीतरी हत्याराने वार करून जखमी केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात संशयित स्वप्नील जाधव, चैतन्य या दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. हवालदार मोरे तपास करीत आहेत.
तर दुसरी घटना म्हसरूळ हद्दीतील पुणे विद्यार्थीगृह संचालित देवधर शाळेबाहेर घडली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

या घटनेत दहावीच्या विद्यार्थ्याला टोळक्याने मारहाण केली. यात विद्यार्थी जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळेतील वादातून काही विद्यार्थ्यांनी टवाळखोरांना बोलावून या विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचे समजते. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल नाही. परंतु, या प्रकरणांमुळे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आता ऐरणीवर आल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

कॅम्पसमधून मोबाईलची चोरी

गेल्या महिनाभरापासून शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होत्या. यादरम्यान बहुतेक महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या बॅगेतून चोरट्यांनी मोबाईल लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: महाविद्यालयांमध्ये संशयित टवाळखोर येतातच कसे, तसेच विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला जातातच कसे, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.