esakal | घंटागाडी कामगार लसीकरणापासून वंचित; तब्बल 44 जणांना कोरोनाची बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

ghantagadi

घंटागाडी कामगार लसीकरणापासून वंचित; तब्बल 44 जणांना कोरोनाची बाधा

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहराच्या सहा विभागांत घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरचा घनकचरा संकलित केला जातो. त्यासाठी १६५ घंटागाड्यांवर साडेनऊशे कर्मचारी काम करत आहेत. नागरिकांशी कायम संपर्क येत असल्याने आरोग्यसेवकांबरोबरच घंटागाडी कामगारांनादेखील लस देणे गरजेचे होते.

आतापर्यंत ४४ कर्मचारी कोरोनाबाधित

घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी कचरा संकलित करणाऱ्या कामगारांसाठी अद्यापही लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली नाही. त्यामुळे भविष्यात कोरोना स्प्रेडर्स ठरण्याची भीती व्यक्त केली जात असून, आतापर्यंत ४४ कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यांपैकी १५ घंटागाडी कामगार उपचार करून घरी परतले. त्यामुळे फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची मागणी होत आहे.

१६५ घंटागाड्यांवर साडेनऊशे कर्मचारी

शहराच्या सहा विभागांत घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरचा घनकचरा संकलित केला जातो. त्यासाठी १६५ घंटागाड्यांवर साडेनऊशे कर्मचारी काम करत आहेत. नागरिकांशी कायम संपर्क येत असल्याने आरोग्यसेवकांबरोबरच घंटागाडी कामगारांनादेखील लस देणे गरजेचे होते. त्याचबरोबर रस्त्यांची झाडलोट करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सातशे सफाई कर्मचाऱ्यांचेदेखील लसीकरण होणे गरजेचे होते, मात्र अद्यापपर्यंत लसीकरण झाले नाही. लसीकरणासाठी ठेकेदारांना पत्रदेखील देण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत लसीकरण झाले नाही. घंटागाडीवर काम करणारे कामगार अल्पशिक्षित असल्याने त्यांच्यासाठी शिबिर आयोजित करून कोरोना काळात घ्यावयाच्या काळजीसंदर्भात जनजागृतीची आवश्यकता आहे; परंतु कामगारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. घंटागाडी कामगारांसाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवावी, तसेच लस घेतल्यानंतर दोन दिवसांची सुटी देण्याची मागणी श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी केली.

घंटागाडी कामगार, तसेच कंत्राटी कामगारांना कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून दिली जाईल. फ्रंटलाइन वर्करसाठी लस उपलब्ध नसल्याने अनेक जण वंचित राहिले. लसीकरण पूर्ण केले जाईल. -डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका