
Womens Day Special : प्रत्येक क्षेत्रात कार्यरत स्त्रीचा सन्मान आवश्यक!
पल्लवी कुलकर्णी-शुक्ल : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : आधुनिक काळातील स्त्रियांसाठी (Women) सर्वच क्षेत्रातील दारे खुले झाली आहेत. पुरूषांच्या बरोबरीने स्त्री प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे.
आव्हानात्मक क्षेत्र, कला क्षेत्र, खासगी क्षेत्र असो वा सरकारी मोठ्या पदावरील आजची स्त्री कणखरपणे आपले कर्तव्य बजावताना दिसते. (comments of various fields women on Respect for working women nashik news)
अष्टभुजा देवीसारखी आजची स्त्री आव्हानात्मक वा इतर क्षेत्रात कार्यरत स्त्री कर्तव्य बजावताना संसाराची जबाबदारी सांभाळत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांशी ‘सकाळ’ ने साधलेला संवाद.
"कुठल्याही क्षेत्रातील सुरवातीचा प्रवास हा हळूहळू सुरू होऊन वेगाने पुढे जातो. त्यामुळे नक्कीच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आजची स्त्रीची प्रगतीचा आलेख चढता असणार आहे, यात शंका नाही." - डॉ. माधुरी कानिटकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त), कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ
"वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारतात पूर्वी मातृसत्ताक कुटुंबपद्धती होती. आजची स्त्री आत्मविश्वास आणि शिक्षणाच्या बळावर सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. म्हणूनच ती आव्हानात्मक क्षेत्रातदेखील सहजतेने वावरताना दिसतेय." - माधुरी कांगणे, अपर पोलिस अधीक्षक
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
"सर्वच क्षेत्रात स्त्रिया ह्या पुढे आहेत. तसेच वनक्षेत्रातील स्त्रियाही जंगलात, वनात आपली कर्तव्य बजावताना पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जात आहेत. वन समृद्धीचे रक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याचा मला अभिमान आहे." - सविता पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, ननाशी (ता. दिंडोरी)
"एक सशक्त महिला म्हणून मी निरंतर प्रयत्न करते कि समाजात आणि आमचा संस्थेत महिला कर्मचाऱ्यांना समान संधी मिळावी. संस्थेत कार्यरत महिला आणि पुरुष असा कोणताच भेद केला जात नाही. संस्थेतील महिला मोठ्या पदांवर कार्यरत आहेत आणि उत्तम कामगिरी करत आहेत." - कोमल सोमाणी, संचालिका, ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन
"पौरोहित्यामुळे संस्कृतीचे संवर्धन होते व त्यामुळे आधुनिक पिढीतही हा वारसा पुढे सहजतेने नेता येतो. घर, संसार चालविताना मुलांवरील संस्कार तसेच घरातील प्रसन्नदायी वातावरण कायमस्वरूपी टिकून राहते." - स्मिता आपटे, पुरोहिता