
Nashik News: पूर्व, नाशिक रोड, पंचवटी विभागात करवसुली असमाधानकारक; NMC आयुक्तांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
नाशिक : आर्थिक वर्ष संपत असताना कर वसुलीचे अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली असून सहा विभागीय अधिकाऱ्यांना वसुली करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला आहे.
पूर्व, पंचवटी व नाशिक रोड या तीन विभागांमध्ये असमाधानकारक वसुली असल्याने या विभागाकडे लक्ष देण्याच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. (Commissioners ultimatum to officials East Nashik Road Panchavati Section Taxation Unsatisfactory NMC Nashik News)
चालू आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात साडेचारशे कोटी रुपयांची घट आली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी कठोर पावले उचलण्यात आली आहे. थकबाकीदार मालमत्ता धारकांना नोटीस पाठवून जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
आतापर्यंत 378 थकबाकीदारांना जप्ती वॉरंट बजावण्यात आले. चालू आर्थिक वर्षामध्ये घरपट्टीच्या माध्यमातून 185 कोटी रुपये, तर पाणीपट्टीसाठी 70 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. घरपट्टीच्या माध्यमातून जवळपास 167 कोटी रुपये, तर पाणीपट्टीच्या माध्यमातून जवळपास 55 कोटी रुपये वसूल झाले आहेत.
विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आढावा घेतला. त्यात पूर्व विभाग, नाशिक रोड व पंचवटी विभागात करवसुलीचे प्रमाण समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उद्दिष्ट गाठण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
सरकारी कार्यालयांशी पत्रव्यवहार
महापालिका हद्दीतील जवळपास 41 शासकीय कार्यालयांच्या इमारती थकबाकीदारांच्या यादीत आहे. महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी पत्रव्यवहार केला, मात्र दाद मिळत नाही. त्यामुळे आता थकीत करवसुली करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाच्या सचिवांशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.
सहा विभागातील घरपट्टी- पाणीपट्टी वसुली (आकडे कोटीत)
विभाग घरपट्टी पाणीपट्टी
सातपूर १९.१७ ७.९४
पश्चिम २९.८७ ६.१०
पूर्व २७.०६ ८.९६
पंचवटी ३१.०० ९.६२
सिडको ३५.६६ १२.५६
नाशिकरोड २४.०८ १०.३०