
SAKAL Exclusive : अभियांत्रिकी, वन, कृषीच्या अभ्यासक्रमाबाबत संभ्रम; विद्यार्थ्यांचा गोंधळ कायम
नाशिक : राज्य सेवा परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणीला स्थगिती दिलेली असली तरी बदल केलेल्या अन्य अभ्यासक्रमांबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठोस भूमिका स्पष्ट केलेली नाही.
त्यामुळे यापूर्वी केलेल्या घोषणेप्रमाणे अभियांत्रिकी, वन आणि कृषी सेवा मुख्य परीक्षांसाठी २०२३ पासून नवीन अभ्यासक्रम लागू असेल की या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी २०२५ मध्ये असेल, याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
ठोस भूमिका आयोगाने जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (Confusion about courses of engineering forest agriculture given by MPSC to be implemented from 2023 Confusion of students continues nashik news)
राज्य सेवा परीक्षांसाठी वर्णनात्मक स्वरूपाचा नवीन अभ्यासक्रम लागू केल्याची घोषणा आयोगाने केली होती. उमेदवारांच्या वाढत्या विरोधानंतर मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनंतर २०२५ पासून अंमलबजावणीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.
परंतु आयोगाकडून याबाबत कुठलेच निर्देश काढले जात नसल्याने राज्यस्तरावर उमेदवारांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले होते. यानंतर गुरुवारी (ता. २३) आयोगाने परिपत्रक काढताना २०२५ पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केलेले आहे.
तत्पूवी गेल्या ७ फेब्रुवारीला आयोगाने परिपत्रक काढताना महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य, महाराष्ट्र वन सेवा मुख्य आणि महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम २०२३ करिता आयोजित परीक्षांपासून लागू करणार असल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणाऱ्या परीक्षांचे अभ्यासक्रम संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. दरम्या,न आता राज्यसेवेकरिता नवीन अभ्यासक्रमाला दोन वर्षांची स्थगिती मिळालेली असताना या परीक्षांनादेखील तोच नियम लावावा, अशी मागणी उमेदवारांकडून केली जाते आहे.
याबाबत आयोगाने भूमिका स्पष्ट करणारे पत्रक काढत संभ्रम दूर करावा, अशीदेखील उमेदवारांची मागणी आहे.
नवीन अभ्यासक्रम केलाय उपलब्ध
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आणि विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी) आणि महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम २४ जानेवारीला, तर महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम १ फेब्रुवारीला प्रसिद्ध केला असल्याचे एमपीएससीतर्फे यापूर्वी नमूद केलेले आहे.
या परीक्षांकरिता वर्णनात्मक स्वरूपाचा नवीन अभ्यासक्रम २०२३ करिता आयोजित परीक्षांपासून लागू राहील, असेही आयोगाने स्पष्ट केलेले आहे. त्यावर अद्याप तरी सुधारित पत्रक काढलेले नाही.