एक्‍स-रेद्वारे होऊ शकेल आता कोरोनाचे निदान? अन् ते कसं काय... 

xray 1.jpg
xray 1.jpg

नाशिक : कोरोनाची लक्षणे आढळली, की स्वॅब घेतला जातो. लॅबमध्ये या स्वॅबवर निरीक्षण करून निदान केले जाते. मात्र या प्रक्रियेला वेळ व खर्च अधिक आहे. त्यावर उपाय म्हणून नाशिकच्या ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि, यांनी छातीच्या एक्‍स-रेद्वारे कोरोनाचे निदान करण्यासंदर्भात संशोधन केले आहे. चाचणीतील सहा हजार 300 रुग्णांच्या एक्‍स-रेद्वारे अचूकतेचे प्रमाण 95.5 टक्‍के इतके राहिले आहे. सध्या महाराष्ट्रासह केरळ व अन्य काही देशांत या तंत्राद्वारे चाचणी केली जाणार आहे. 

"ईएसडीएस'चे संशोधन : महाराष्ट्र, केरळसह परदेशांत होणार चाचण्या 

गेल्या दीड महिन्यापासून ईएसडीएस यांच्यामार्फत हे संशोधन सुरू होते. यात प्रामुख्याने डेटा सायंटिस्ट व रेडिओलॉजिस्ट अशा तज्ज्ञ मंडळीने सहभागी होत संशोधन केले. या दरम्यान सुमारे पन्नास हजार संशयितांच्या एक्‍स-रेची तपासणी केली. त्यातून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सहा हजार 300 रुग्णांपैकी 95.5 टक्‍के रुग्णांबाबतचे अचूक निदान या तंत्राद्वारे करण्यात यश आले. या संशोधनासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही माहिती दिलेली असून, त्यांनीही तंत्रज्ञान अवलंबाविषयी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासोबत केरळ व अमेरिका, यूके अशा विविध देशांमध्ये "ईएसडीएस'मार्फत अशा स्वरूपातील तपासणी केली जाणार आहे. सध्या काही देशांमध्ये अशा प्रकारे एक्‍स-रेचा अभ्यास करून कोरोनाचे निदान केले जात असले तरी भारतातील हा पहिलाच प्रयत्न आहे. 

कमी खर्चात निदान 
सध्या लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी प्रतिव्यक्‍ती सुमारे साडेचार हजार रुपये खर्च येत असतो. परंतु एक्‍स- रे तपासणीद्वारे अवघ्या दोन-तीनशे रुपयांत संभाव्य धोका तपासता येणार आहे. ज्या व्यक्‍तींमध्ये कोरोनाचा धोका अधिक असल्याचे निदर्शनात आल्यास केवळ अशा व्यक्‍तींची स्वॅब चाचणी करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. यातून नमुने तपासणीवरील भार कमी होताना दुसरीकडे खर्चातही मोठी बचत होऊ शकेल. 

मशिन लर्निंग, एआयचा प्रभावी उपयोग 
या संशोधनांतर्गत संबंधित व्यक्‍तीच्या छातीचा एक्‍स- रे काढून तो ऑनलाइन पोर्टलवर संबंधित रेडिओलॉजिस्ट लॉगइन आयडी व पासवर्डच्या सहाय्याने अपलोड करतील. त्यानंतर काही मिनिटांत एक्‍स-रेचा अहवाल प्राप्त होण्यास मदत होईल. त्यामुळे संबंधितास कोरोनाचा धोका असल्यास तातडीने उपचार प्रक्रियेत सहभागी करून घेता येणे शक्‍य होईल. यासाठी साकारलेले पोर्टल हे मशिन लर्निंग व आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) या तंत्रज्ञानाच्या आधारे काम करते. 

महापालिका प्रशासन, जिल्हा रुग्णालयाचे चांगले सहकार्य
एक्‍स- रेद्वारे कोरोनाचे संभाव्य निदानाची प्रणाली अत्यंत उपयुक्‍त ठरेल. सध्या आम्हाला 95.5 टक्‍के अचूकता मिळालेली असली तरी आणखी सुधारण्यावर भर आहे. सोमवार (ता. 18)पासून या तंत्राद्वारे चाचण्यांना सुरवात होईल. महापालिका प्रशासन, जिल्हा रुग्णालयाचे चांगले सहकार्य लाभत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही "आयसीएमईआर'शी निगडित प्रक्रियाही पूर्ण करू. 
- पीयूष सोमाणी, संस्थापक व सीईओ, ईएसडीएस  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com