कोरोना निर्बंधाची वर्षपूर्ती : कृषी अन पूरक उद्योगांवर चार हजार कोटींची कुऱ्हाड 

farm land.jpg
farm land.jpg

नाशिक : कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात कृषी व पूरक उद्योगाने तीव्र उतार अनुभवला. कृषिपंढरीतील द्राक्षे, कांदा, डाळिंब, भाजीपाला यासह पोल्ट्री इंडस्ट्रीवर चार हजार कोटींची कुऱ्हाड कोसळली. ऐन हंगामात मागणी व पुरवठा साखळी अडचणीत सापडली. जिल्ह्यात लॉकडाउनचा सर्वांत मोठा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला. प्रमुख बाजारपेठेत मालवाहतूक, व्यापाऱ्यांची नसलेली उपलब्धता व मंदावलेली निर्यात प्रक्रिया या प्रमुख समस्या होत्या. 

कृषी अन पूरक उद्योगांवर चार हजार कोटींची कुऱ्हाड 
जिल्ह्यातील ५८ हजार ३६७ हेक्टर लागवडीपैकी हंगामाच्या अंतिम टप्प्यात ४० टक्के बागांमध्ये द्राक्षे शिल्लक होती. व्यापाऱ्यांशी सौदे करून व्यवहार ठप्प होते. उठाव नसल्याने थेट विक्री, व्यापारी, बेदाणानिर्मिती अशा पर्यायी व्यवस्थेतून ५० टक्के माल खपला असला, तरी दोन लाख टन माल अडचणीत सापडला. सर्वसाधारण दहा रुपयांप्रमाणे खरेदी झाल्याने किलोमागे ४० रुपयांपर्यंत फटका बसला. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या नुकसानीचा आकडा सोळाशे कोटींवर गेला होता. आता पुन्हा अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट व कोरोनाची संभाव्य स्थिती मारक ठरत असून, हे नुकसान पुन्हा एक हजार कोटींवर गेल्याचा अंदाज आहे. 

संकटामुळे अभूतपूर्व भावात घसरण; अवकाळी-गारपिटीचा दणका आणखी निराळा 
जिल्ह्यातील दोन कोटी क्विंटल उन्हाळ कांदा गेल्या वर्षी ऑक्टोबरअखेर सरासरी ७५० रुपये क्विंटल म्हणजे उत्पादन खर्चाच्या खाली विकला गेला. त्यामुळे तेराशे कोटींचा फटका सोसावा लागला. जिल्ह्यात हंगामी २० हजार एकरवरील ढोबळी मिरची, कारले, काकडी, वांगे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी ही पिके काढणीला असताना मागणी नसल्याने शेतात माल पडून राहिला. भाजीपाला रोपे, कृषी निविष्ठा, वीजबिल, मजूर टंचाई यावर केलेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक विवंचनेत होते. त्यामुळे काहीजण मोफत वाटत होते, तर काहीजण जनावरांपुढे टाकत होते. समोर दिशाच नसल्याने काहींनी धीर सुटल्याने नांगर चालवला. परिणामी गतवर्षी उलाढाल ७० टक्क्यांनी घटली. प्रशासनाचे वेळीच सहकार्य न झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे हे नुकसान २५० कोटींवर झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी सांगितला. लॉकडाउनमध्ये ठोस धोरण राबविण्यात न आल्याने बाजार समित्यांच्या धरसोडीच्या निर्णयांचा फटका भाजीपला उत्पादकांना बसला. 

‘पोल्ट्री‘वर तिहेरी संकट 
‘पोल्ट्री’वर तिहेरी संकट कोसळले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत अफवा आणि पुढे वाहतुकीचा प्रश्‍न, त्यानंतर बर्डफ्लू यामुळे पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान झाले. खेळते भांडवल, मजूर टंचाई असे विविध प्रश्न उपस्थित झाले. परिणामी राज्यभरात ब्रॉयलर पक्ष्यांची ‘प्लेसमेंट’ कमी होऊन ती निम्म्यावर आली. पुन्हा नुकसान होण्याची जोखीम नको म्हणून पोल्ट्री उद्योगाने सावध पावले टाकली. अफवांमुळे विक्री मंदावल्याने व दरातील नीचांकी घसरण होऊन उत्पन्नात मोठी घट झाली. परिणामी गतवर्षी मार्च व एप्रिलपासून ‘बॅच’ टाकल्या गेल्या. मात्र राज्यात असणारी सरासरी ‘प्लेसमेंट' साडेचार कोटींवरून साडेतीन कोटींवर आली. गतवर्षात या उद्योगाचे बावीसशे कोटींचे राज्यभर नुकसान होते. त्यात नाशिक जिल्ह्यात ७०० कोटींचे नुकसान होते. 


किंचितसा दिलासा 
कृषी विभागाच्या पुढाकारातून वाहतूक परवाने यांसह विक्रीसाठी मुंबई, ठाणे यासह उपनगरात विक्रीसाठी सहकार्य झाल्याने किंचितसा दिलासा मिळाला. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीसारख्या संघटित शेतकरी कंपन्यांनी ‘फ्रूट ॲन्ड व्हेजिटेबल बास्केट' संकल्पना पुढे आणली. त्याचे अनुकरण राज्यात अनेक घटकांनी केले. संघटित घटकांनी कामकाजाची पुढील दिशा ठरविल्याने जोखीम कमी केल्याने त्यांना पर्यायी व्यवस्था उभारून नुकसान टाळण्यात काही प्रमाणात यशही आले. 


कोरोनामुळे अडचणी होत्याच. मात्र नैसर्गिक आपत्तीसह व्यापारी व निर्यातदार यांच्या मनमानीचा फटका आहे. त्यामुळे या वर्षी एक हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक उभा राहील, हा प्रश्नच आहे. -
रवींद्र बोराडे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघटित कुक्कुटपालन व्यवसायाचे अर्थकारण बिघडले. काम करणाऱ्या कंपन्या, करार पद्धतीने जोडले गेलेले शेतकरी व या व्यवसायावर अवलंबून असणारे घटक आर्थिक कोंडीत सापडले. कुठलाही शास्त्रीय तर्क नसताना सोशल मीडियावरील अफवेमुळे कुक्कुटपालन क्षेत्रातील लवकर भरून न निघणारे मोठे नुकसान झाले. त्यानंतर बर्ड फ्लूचा मोठा फटका आहे. - उद्धव अहिरे, सचिव, महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर्स असोसिएशन 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डाळिंब पिकाला काहीअंशी दिलासा मिळाल. लागवडी मर्यादित असल्याने डाळिंब दरावर परिणाम नव्हता. मात्र काहीअंशी फटका बसला आहे. हे नाकारता येणार नाही. -रवींद्र पवार, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य डाळिंब बागायतदार संघ  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com