
Nashik News : धारणगाव -खडक ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार; ग्रामपंचायत सदस्यांचे महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषण
Nashik News: धारणगाव खडक (ता.निफाड) येथील ग्रामपंचायत सदस्य नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत. ग्रामसेवकाने केलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात हे त्यांचे उपोषण असून ग्रामसेवकावर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
(Corruption in Dharangaon Khadak Gram Panchayat Gram Panchayat members on hunger strike outside Revenue Commissioners office nashik news)
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
ग्रामसभा प्रोसिडिंग बुकमध्ये खाडाखोड करण्यात आली असून शेतकरी चर्चा कार्यक्रमात निधीचा अपहार केला आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये भला मोठा भ्रष्टाचार आहे. दलितवस्ती सुधार योजनेत मलिदा खाण्यात आला आहे.
नियमाप्रमाणे मासिक सभा व ग्रामसभा न चालवण्यात आल्यामुळे मनाने ग्रामसभेचे रिपोर्ट लिहिले जातात. पाहिजे तसा ठराव लिहून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून ग्रामसेवकाला कडक शासन झाले पाहिजे.
ग्रामपंचायतीचे झालेले नुकसान भरून निघाले पाहिजे, यासाठी ग्रामपंचायत सदस्य विलास जाधव, सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते जगन काकडे, सागर सोनवणे, संदीप क्षीरसागर, दत्तू बोडके, शरद जाधव यांनी बंड पुकारले आहे.
"काही जुन्या प्रकरणासंबंधी ग्रामपंचायत सदस्य भ्रष्टाचाराचा आरोप करीत असून गावातील स्थानिक वैयक्तिक राजकारणापोटी हे आरोप केले जात आहेत."
- अतुल आढाव, ग्रामसेवक, धारणगाव- खडक
"दोष सिद्ध होऊनही ग्रामसेवकावर कारवाई होत नाही, चालढकल सुरू आहे. ग्रामसेवक दोषी असून भ्रष्टाचारासंबंधी कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे."
- विलास जाधव, ग्रामपंचायत सदस्य, धारणगाव- खडक