Nashik Crime News : भररस्त्यात वाढतेय गुंडागर्दी! 2 महिन्यात 11 प्राणघातक हल्ले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : भररस्त्यात वाढतेय गुंडागर्दी! 2 महिन्यात 11 प्राणघातक हल्ले

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात भरदिवसा गुंडागर्दीच्या घटना घडत आहेत. हातात हत्यारे घेऊन दहशत माजविण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. गत वर्षभरात भादंवि ३०७ अन्वये प्राणघातक हल्ल्याचे २३ गुन्हे दाखल झाले होते.

मात्र, यंदा गेल्या दोन महिन्यातच प्राणघातक हल्ले करण्याचे ११ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले असून, यावरून शहरातील वाढती गुंडागर्दी चिंताजनक आहे.

तर दुसरीकडे पोलिसांना कठोर कारवाईचाच विसर पडल्याने खुलेआम हत्यारे घेऊन दहशत माजविण्याची मुजोरी नुकतीच मुसरुड फुटणाऱ्यांमध्ये वाढली आहे. (crime is increasing 11 fatal attacks in 2 months Nashik News)

शुक्रवारी (ता. २४) अंबड हद्दीत भर दुपारी एका कामगाराला मारहाण केल्यानंतर पुन्हा हातात हत्यारे घेऊन त्याच्यामागे धावले. मोठ्या मुश्‍किलीने त्याने अंबड पोलिस ठाणे गाठल्याने त्याचा जीव वाचला. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन चौघांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.

तर गेल्या आठवड्यात पंचवटीमध्ये कामावरून घराकडे परतणाऱ्याला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पिस्तुलीचा धाक दाखवून लुटले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास हिरावाडी परिसरात सावज हेरत फिरताना पोलिसांनी त्यांना पकडले.

असाच प्रकार शनिवारी (ता. २५) रात्री टाकळी रोड परिसरात घडला. ट्रकचालकाला लुटण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिस आल्याने ते पळाले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना अटक केली.

त्याचप्रमाणे, चॉपर, कोयते, गावठी कट्टे बाळगणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी गेल्या काही दिवसात मोठ्याप्रमाणात कोयते, तलवारी जप्त केल्या आहेत. तरीही अशी हत्यारे बाळगून परिसरामध्ये दहशत माजविण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. वाढत चाललेल्या या गुंडागर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा होते आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

कोम्बिंगचा विसर

सातपूर, सिडको, उपनगर, नाशिकरोड, वडाळा, भारतनगर, दत्तनगर (अंबड) या परिसरात हत्यारे बाळगून दहशत माजविण्याचे प्रमाण आहे. या परिसरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याची गरज आहे.

याच परिसरात प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सततच्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुंडागर्दी करणाऱ्यावर पोलिसांचा वचक निर्माण होऊन आळा बसू शकेल. मात्र, पोलिसांकडून यात सातत्य नसल्याने गुंडागर्दीचे प्रकार घडत असल्याचे बोलले जाते.

प्राणघातक हल्ल्याची आकडेवारी

२०२२ (वर्षभरात) : २३

२०२३ (जानेवारी/फेब्रुवारी) : ११