Unseasonal Rain: अवकाळी, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान; कांद्याला प्रादुर्भावाची शक्यता, पीक झाकण्यासाठी धावपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

unseasonal rain file photo

Unseasonal Rain: अवकाळी, गारपिटीमुळे पिकांचे नुकसान; कांद्याला प्रादुर्भावाची शक्यता, पीक झाकण्यासाठी धावपळ

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यात काही भागात मध्यरात्रीनंतर विजांसह अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिल्याने शेतकरी राजावर मोठे संकट ओढवले आहे. देवपूर, फरदापूर, धारणगाव ,खोपडी आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा पिकांचे बुधवारी व गुरुवारी झालेल्या पावसात मोठे नुकसान झाले आहे. (crop damage due to unseasonal hail Chance of onion infestation rush to cover crop nashik news)

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गुरुवारी (ता. १६) पासून गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. आंबा पिकांचे अगोदरच मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा झाडावर असलेल्या मोहोरला गारांच्या पावसामुळे लहान कैऱ्या गळून पडलेल्या आहेत.

त्यातच गुरुवारी मध्यरात्रीपासून विजांसह गारपिटीचा पाऊस त्यात पहाटे ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्यांनी वातावरणाची धास्ती घेतली आहे. जिल्ह्यात अनेक भागात गहू सोंगणीला आलेला असताना हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे.

तर उन्हाळ कांद्याची काढणी सुरू झाली असून या पावसाचा या कांद्यालाही मोठा फटका बसलेला आहे. गहू, हरभरा, मका, हे सोंगणीला आलेले पीक पावसात भिजल्याने खूप मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. सिन्नर तालुक्यात शेतकरी कांदा, गहू हे पीक झाकण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे. त्यातच द्राक्ष उत्पादकांमध्ये या गारपिटीने चिंता वाढवली आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

७५ हेक्टरवर पंचनामे

प्रशासनाने त्वरित या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, शेतकरी वर्गातून होत आहे. सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका, द्राक्ष यांचे नुकसान झाल्याने ७५ हेक्टरवर नुकसानीचे पंचनामे कृषी, महसूल विभागाने तालुक्यात केलेले आहेत.

"शेतामधील काढणीला आलेले गहू, हरभरा, आधी पिकांना फटका बसलेला असून अस्मानी संकट पुन्हा तालुक्यात उभे ठाकले आहे. कांदा पिकांनाही या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे. काढणीला आलेल्या कांद्याला रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे." - गोवर्धन रानडे, शेतकरी, फरदापूर