Sakal Exclusive : समृद्धीची वाट पैठणीचा मोर खुलविण्यासाठी ठरणार वहिवाट! | Customers will increase in buying Mahavastra paithani during smooth travel from Nagpur to Mumbai Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paithani News

Sakal Exclusive : समृद्धीची वाट पैठणीचा मोर खुलविण्यासाठी ठरणार वहिवाट!

Nashik News : समृद्धी महामार्गाची वाट पैठणीचा मोर खुलविण्यासाठी वहिवाट ठरणार आहे. नागपूर ते मुंबई प्रवासात महावस्त्र खरेदीचे आकर्षण वाढत चाललयं. येवल्यासाठी २२ आणि शिर्डीजवळील २७ किलोमीटर असे प्रवासाचे अंतर आहे.

नागपूर ते शिर्डी हा महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर आता शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा नुकताच कार्यान्वित झाला.

त्यात सिन्नरच्या गोंदे इंटरचेंज हून नाशिक, नगर, पुणे आणि त्या भागासाठी महामार्गाचा उपयोग होत असून भरवीर इंटरचेंजपासून घोटी-नाशिक, ठाणे, मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सोयीचा झालायं. (Customers will increase in buying Mahavastra paithani during smooth travel from Nagpur to Mumbai Nashik News)

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल असे सातत्याने म्हटले गेले.

नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम,अकोला,बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे, मुंबई या जिल्ह्यातील महामार्गामुळे जवळपासच्या २६ तालुक्यांच्या वाहतुकीला फायदा होणार आहे.

थेट विदर्भ, मराठवाड्यातून यापूर्वी येवल्याला पैठणी खरेदीसाठी येण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना हा महामार्ग आता अधिक सोयीचा झाला. अशीच परिस्थिती मुंबई-ठाण्याबाबत आहे. तिकडूनही नाशिकमार्गे येवला अंतर अधिक व वेळ खाऊ असल्याने अनेक जण खरेदीला येण्यास टाळाटाळ करत स्थानिक बाजारात खरेदी करत होते.

सुसाट चालणाऱ्या समृद्धीमुळे मुंबईहून अथवा मराठवाडा, विदर्भातून निघून थेट शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन अवघ्या अर्ध्या तासात आता येवल्याला पोचणे शक्य होणार असल्याने पहिल्या टप्प्यात या भागातील ग्राहकांचा कल पैठणीच्या खरेदीसाठी वाढल्याचे विक्रेते सांगू लागले आहेत.

समृद्धीमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल असा दावा सरकारने केला. शिर्डी, लोणार सरोवर, वेरूळ, अजिंठा, औरंगाबाद, एलोरा, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर, पंचवटी-नाशिक आणि इगतपुरीमधील ‘हिल स्टेशन’ महामार्गाला समृद्धीने जोडले आहे.

येवल्याची बाजारपेठ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समृद्धीला जोडून खरेदी विक्रीला चालना मिळू लागली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"येवला पैठणीच्या बाजाराला राज्यातून ग्राहकांची पसंती मिळते. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील पर्यटक पैठणीच्या खरेदीला येतात. समृद्धीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील ग्राहकांना आता येवला सोपे होणार असून शिर्डीला येणारे साईभक्त सहजपणे येवल्यात येऊन पैठणी खरेदी करू शकतील. येवल्याच्या बाजारपेठेला समृद्धीचा फायदा होईलच."

- दिलीप खोकले, संचालक, कापसे पैठणी, येवला

"अंतर व वेळेच्या अपव्ययामुळे आपल्या भागातच पैठणी खरेदी करणारे ग्राहक आता समृद्धीमुळे थेट येवल्यात येऊ लागलेत.

तसे आता शिर्डीला येणारे साईभक्त दर्शनानंतर येवल्यात खरेदीला येतात. आता शिर्डी ते येवला अंतर अत्यल्प असून ग्राहकांना थेट उत्पादित पैठणी खरेदी करता येईल. शिवाय येथील उत्पादकांनाही राज्यभर आपल्या पैठणी पोचविण्यास त्याचा फायदा होणार आहे."

- मनोज दिवटे, उत्पादक -विणकर