Dada Bhuse : वाहतूक नियोजनासाठी सहकार्य करावे : दादा भुसे | Dada Bhuse statement Cooperate for traffic planning nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse news

Dada Bhuse : वाहतूक नियोजनासाठी सहकार्य करावे : दादा भुसे

Dada Bhuse : शहरातील विविध भागात नगरविकास विभागाच्या शंभर कोटी निधीतून सिमेंटकॉँक्रीट रस्ते, पुलांची कामे सुरू आहेत. काही कामे पुर्ण झाली आहेत. रस्ते व पुलांचे काम प्रगतिपथावर आहे.

ही कामे सुरु असताना शहरवासियांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिका, शहर वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विकास कामे करणाऱ्या मक्तेदाराला योग्य पद्धतीने वाहतूक नियोजन करण्यासह फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शहरवासीयांनी या काळात वहातूक नियोजनासाठी सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. (Dada Bhuse statement Cooperate for traffic planning nashik news)

श्री. भुसे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, शहर अभियंता कैलास बच्छाव, उपअभियंता महेश गांगुर्डे, शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र गोसावी, प्रभाग अधिकारी जगदीश खोडके आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, की या विकास कामांसाठी एक वर्षाची मुदत आहे. कामे सुरु असताना दोन ते तीन महिने शहरवासीयांना थोडा त्रास होईल. नवीन वहातूक नियोजनात हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न आहे. रस्ते कामे सुरु असताना वाहतूक कोंडी मोजक्या ठिकाणी होते.

यासाठी पर्यायी व जोड रस्त्यांचा वापर तर काही रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. शहरवासीयांनी या काळात वळण रस्ते, पर्यायी रस्त्यांचा वापर करावा. मनपा प्रशासनाने चार दिवसांत सर्व प्रमुख रस्त्यांवर असलेले खड्डे व चेंबर यांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती व अन्य कामे करावीत असे आदेश त्यांनी दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सर्व विकास कामे अधिक वेगाने पावसाळ्यापूर्वी व्हावे अशी अपेक्षा आहे. पुलांसारख्या कामांना काही अवधी लागू शकतो. पावसाळ्यातही सिमेंट रस्त्यांची कामे करण्यास अडचण येत नाही. हा थोडा त्रास सहन केल्यास रस्त्यांची कामे झाल्यानंतर शहरातील दळणवळण सुलभ व सोयीचे होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख मार्गांवर वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करावी. दुकानासमोर रस्त्यावर फलक लावणाऱ्या दुकानदारांना समज द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या.

टॅग्स :Nashikdada bhuse