Nashik News | जोगलटेंबी-दारणा सांगवीकरांचा धोकादायक प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dangerous journey by boat from one village to another nashik Jogaltembhi

नाशिक : जोगलटेंबी-दारणा सांगवीकरांचा धोकादायक प्रवास

नाशिक : जोगलटेंबी अन दारणा सांगवी गावाजवळ दक्षिण वाहिनी गोदावरी व दारणा नदीचा संगम होतो. आजही एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी बोटीतून धोकादायक प्रवास करावा लागतो. गेल्या वीस वर्षांपासून इथे पुलाची मागणी करून देखील अद्याप त्याला मुहूर्त मिळाला नाही. इथे पूल होण्यातून सिन्नरसह निफाड आणि नाशिकच्या सीमारेषा जोडल्या जाणार आहेत.

बोटीत दुचाकी ठेऊन नदीच्या दुसऱ्या बाजूला नेल्या जातात. नदीच्या मंदिराच्या एका बाजूला जोगलटेंबी, तर पलीकडील बाजूला दारणा सांगवी हे गाव आहे. इथे पूल उभारल्यास पिंपळगाव, लासलगाव, सायखेडा बाजारात शेतमाल नेण्यासाठी मदत होणार आहे. रुग्णांना नाशिकच्या दवाखान्यात नेण्यासाठी जवळचा रस्ता होणार आहे.

सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जाणाऱ्या तरुणांना हा मार्ग जवळचा होईल. या ठिकाणी नदीची खोली अधिक असल्याने विद्यार्थी बोटीने प्रवास करत शिक्षण घेत आहेत. लोकप्रतिनिधींकडे पुलासाठी आग्रह धरला गेला. सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवण्यात आलेत. मात्र पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांची आहे.

२२ जण अन् ५ दुचाकी

एका वेळेस बोटीमधून २२ जण आणि ५ दुचाकींचा प्रवास होतो. सर्वांचा विमा ग्रामपंचायातीने उतरवला आहे. पूल होत नसल्याने ग्रामपंचायातीला लिलाव करून बोट चालवावी लागते.

काय म्हणताहेत ग्रामस्थ

दत्तात्रय तांबे (माजी सरपंच, जोगलटेंबी, ता. सिन्नर) : बोटीच्या प्रवासातून जीवाला धोका पोचू शकतो. मी अनेक वर्षांपासून इथे पुलाची मागणी करत आहे. पण त्याची दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने उपोषणाच्या आंदोलनाखेरीज पर्याय उरलेला नाही.

कांतिलाल बोडके (सरपंच, दारणा सांगवी, ता. निफाड) : दोन गावांना जोडणारा पूल होण्यातून ग्रामविकासाला चालना मिळेल. सिन्नरला जाण्यासाठी १२ किलोमीटरचे अंतर होईल. त्यातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ‘नाबार्ड'' योजनेतून पूल व्हावा, अशी आमची मागणी आहे.

सुनील साळवे (माजी उपसरपंच, दारणासांगवी) : आमच्या गावात अनेक मंदिरे आहे. सतराव्या शतकातील शिव मंदिर पाहण्यासाठी राज्यातून पर्यटक येतात. गावात यात्रा भरते. यात्रेला गर्दी होते. पूल होण्यातून रोजगार निर्मितीला मदत होईल.

विष्णू तांबे (शेतकरी, जोगलटेंबी) : शेतमाल पिंपळगाव, लासलगाव, सायखेडा बाजारात नेण्यासाठी पूल उभारायला हवा. वाहतूक खर्च वाचण्यातून शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्यास मदत होईल.

रावसाहेब गोहाड (ग्रामस्थ, दारणा सांगवी) : खासदार, आमदारांकडे पूलाची मागणी केली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांची पुलासाठी भेट घेतली होती. त्यांनी पूल लवकर होईल, असे अश्‍वस्त केले आहे. पूल होण्यातून आमचा धोकादायक प्रवास थांबणार आहे.-

Web Title: Dangerous Journey By Boat From One Village To Another Nashik Jogaltembhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikvillageJourney