Nashik: पावसाळ्यापूर्वी धोकादायक वाडे, घरांना नोटिसा; धोकादायक भाग उतरवण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर | Dangerous mansion notices to houses ahead of monsoon Head of department responsible for unloading dangerous parts Nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

old danger wada

Nashik: पावसाळ्यापूर्वी धोकादायक वाडे, घरांना नोटिसा; धोकादायक भाग उतरवण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर

Nashik : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वाडे व इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधितांना नोटिसा बजावून तातडीने खाली करण्याची कारवाई अशा सूचना विभागीय आयुक्त तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभाग प्रमुखांना दिल्या.

दरम्यान, यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार धोकादायक भाग किंवा संपूर्ण वाडा उतरवण्याची जबाबदारदेखील विभागप्रमुखांना पार पाडावी लागणार आहे. (Dangerous mansion notices to houses ahead of monsoon Head of department responsible for unloading dangerous parts Nashik news)

पुढील महिन्यापासून पावसाळा ऋतूला सुरवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून तयारी सुरू झाली आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे डोकेदुखी ठरू नये यासाठी १५ मेपूर्वीच रस्ते दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे पावसाळी व भुयारी गटारी साफ करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती व वाडे पडण्याची भीती अधिक असते. त्यामुळे दरवर्षी ७ जूनच्या आत विभाग अधिकाऱ्यांमार्फत धोकादायक वाडे व इमारतीचे मालक व भाडेकरू यांना नोटीस पाठवली जाते.

धोकादायक भाग उतरवून घेण्याची जबाबदारी संबंधितांची असते किंवा त्यांनी न उतरविल्यास महापालिकेने धोकादायक भाग उतरविणे आवश्यक असते. परंतु दोन्ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. पावसाळ्यात मात्र धोकादायक भाग कोसळून जीवित व वित्तहानी होते.

असे असले तरी नियमानुसार धोकादायक इमारतींना नोटिसा पाठविणे बंधनकारक असल्याने त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत तातडीने पावसाळ्यापूर्वी धोकादायक वाडे व घरांना नोटिसा बजावण्याच्या सूचना दिल्या आहेत. धोकादायक भाग न उतरविल्यास संबंधितांना जबाबदार धरले जाईल असाही इशारा दिला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हानी झाल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हा

नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरांमध्ये जवळपास १०७७ धोकादायक इमारती व वाडे आहेत. मागील वर्षी तत्कालीन आयुक्त रमेश जाधव यांनी तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारती व वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या व धोकादायक इमारती व वाड्यांमधील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या.

आयुक्त पुलकुंडवार यांनीदेखील धोकादायक मालमत्ता संदर्भात दक्षता घेताना १०७७ वाडे व इमारतींची संयुक्त पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांसह विभागीय अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारती व वाड्यांमधील घरमालक व भाडेकरूंशी चर्चा करून धोकादायक इमारती उतरून घेण्याच्या सूचना दिल्या.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६८ नुसार पोलिसांच्या मदतीने धोकादायक इमारती उतरवून घेण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. धोकादायक भाग कोसळून हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

विभाग धोकादायक घरे व वाडे

पश्चिम ६००

पंचवटी १९८

पूर्व ११७

नाशिकरोड ६९

सातपूर ६८

सिडको २५

-------------------------------------

एकूण १,०७७