
Nashik Crime: बाटलीच्या काचेने वार करून निर्घृण खून; जेलरोड परिसरातील CCTV फुटेज ताब्यात
Nashik Crime : जेल रोड परिसरातील राहत्या फ्लॅटमध्ये एकाची विळीने गळ्यावर वार करून तसेच, मद्याच्या बाटलीच्या काचेने वार करून निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले आहे.
प्रवीण मधुकर दिवेकर (४३, रा. हेतल हाउसिंग सोसायटी, जेल रोड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याचे आईवडील सोमवारी (ता. २९) सकाळी घरी आल्यानंतर सदर बाब उघडकीस आली.
याप्रकरणी उपनगर पोलिसात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
प्रवीण दिवेकर हे मुंबईत राहतात. परंतु कौंटुबिक वादातून ते १५-२० दिवसांपासून हेतल हाउसिंग सोसायटीमध्ये एकटेच राहत होते. तर, चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाने कौटुंबिक कारणातूनच गळफास घेत मुंबईमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दिवेकर हे एकटेच राहत असल्याने त्यांचे आईवडील सोमवारी सकाळी नाशिकला आले असता, प्रवीण हे घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती उपनगर पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त अंबादास भुसारे, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मृत दिवेकर यांच्या गळ्यावर विळीने वार केले असून मद्याच्या बाटल्या फोडून काचांनी त्यांच्या शरीरावर वार केले होते. सदर घटना सोमवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या दरम्यान झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
तर, रविवारी (ता. २८) रात्री प्रवीण दिवेकर यांनी कुटुंबीयांना फोन करून बोलल्याचे नातलगांनी पोलिसांना सांगितले आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत नमुने संकलित केले आहेत तर, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींचा शोध घेत फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.
"दिवेकर खूनप्रकरणी तपासासाठी काही पथके नेमण्यात आली असून, तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातूनच दिवेकर यांचा खून करण्यात असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत त्यांची तपासणी सुरू आहे. लवकरच संशयित जेरबंद होतील." - चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन.