RTE Admission : आरटीई प्रवेश ऑनलाइन अर्ज दाखलसाठी 17 मार्चपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE Admission

RTE Admission : आरटीई प्रवेश ऑनलाइन अर्ज दाखलसाठी 17 मार्चपर्यंत मुदत

नाशिक/येवला : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत, शाळांची नोंदणी प्रक्रीया झाल्यानंतर पुढील वेळापत्रकांची लागलेली प्रतिक्षा संपली असून, वेळापत्रक जाहीर झाले आहे.

या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ या वर्षासाठी पालकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. १ ते १७ मार्चपर्यंत पालकांना आररटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्जाची मुदत आहे. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. (Deadline for RTE admission online application 17th March nashik news)

आरटीई अंतर्गत २५ टक्के आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेशासाठी राखीव असतात. गतवर्षी डिसेंबर महिन्यातचं आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले होते. जानेवारी महिन्यात शाळांची नोंदणी होऊन फेब्रुवारीत प्रवेश प्रक्रीया वेळापत्रक जाहीर झालेले होते.

यंदा जानेवारीत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीत शाळांची नोंदणी झालेली आहे. या प्रक्रियेस २३ जानेवारीपासून सुरवात झाली. त्यासाठी ३ फेब्रुवारीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती.

यात ४०१ शाळांची नोंदणी झालेली आहे. गतवर्षी नाशिक जिल्ह्यातील ४२२ शाळांनी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता. यंदाची प्रवेश प्रक्रिया साधारण २० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक रखडले होते अशी चर्चा होती. अखेर, वेळापत्रक जाहीर होऊन मंगळवारपासून (ता.१) अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. १७ मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.

त्यानंतर साधारण मार्च अखेर सोडत जाहीर होण्याची शक्यता असून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया एप्रिल व मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील ४०१ शाळांमध्ये यंदा २५ टक्के अंतर्गत राखीव असलेल्या ४ हजार ८५४ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जाणार आहेत.

टॅग्स :NashikeducationRTE