esakal | महापालिकेकडून मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी; काही संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत

बोलून बातमी शोधा

death
महापालिकेकडून मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी; काही संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाणाऱ्या नाशिक शहरात मृत्यूच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिकेच्या दप्तरी आतापर्यंत सुमारे चौदाशे मृत्यू असल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात साडेतीन हजारांहून अधिक मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावरून महापालिकेकडून मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याविरोधात काही संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. तर आमदार सीमा हिरे यांनीदेखील एप्रिल महिन्यात झालेल्या मृत्यूची आकडेवारी देण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

महापालिकेकडून मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी

शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढत आहे. रुग्णांचा आकडा दोन लाखांचा टप्पा येत्या काही दिवसांत गाठणार आहे. सध्या शहरात २२ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यातील ८४ टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. शहरात एकूण १७ स्मशानभूमी असून, त्या स्मशानभूमीमध्ये सरणावर जाळलेल्या मृतदेहांचे आकडेवारी १६ एप्रिलपर्यंत दोन हजार ३९० होती. या आकडेवारीमध्ये विद्युतदाहिनी, गॅसदाहिनी, तसेच मुस्लिम, ख्रिश्चन, गोसावी, नाथपंथीय, तसेच लिंगायत आधी धर्म व पंथीयांचे दफन विधीची आकडेवारीचा समावेश नाही. साधारण तीस टक्के लोकसंख्येचा विचार जरी केला तरी मृतांची आकडेवारी २८ एप्रिलपर्यंत एकूण मृतांची आकडेवारी चार हजारच्या दरम्यान गेली असावी, असा अंदाज आहे. परंतु महापालिकेकडून आकडेवारी प्रसिद्ध केली जात नाही. नागरिकांना शहरात प्रत्यक्ष स्थिती काय आहे, यासंदर्भात माहिती मिळणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन काही संस्थांनी महापालिकेकडे विचारणा केली. मात्र कर्मचारी उपलब्ध नाही. जे कर्मचारी जन्म-मृत्यूची नोंद करतात ते कोरोनाबाधित असल्याची कारणे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. महापालिकेने एप्रिल महिन्यातील सर्व धर्मियांच्या मृतांची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

आठ ते दहा तासांचे वेटिंग कसे?

स्मशानभूमीमध्ये जागा मिळत नाही, दफनभूमीसाठी जागा मिळत नाही, अशी तक्रार असताना महापालिकेकडून दररोज बारा-पंधरा मृतांची संख्या दर्शविली जात आहे. सर्व स्मशानभूमी मिळून ७० बेड आहे. महापालिकेच्या माहितीनुसार दररोज दहा ते पंधरा मृत्यू होत असतील तर आठ ते दहा तासांचे वेटिंग कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मृतांची आकडेवारी अधिक असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे; परंतु ती किती? याबाबत आकडा सांगितला जात नाही. नाशिक शहरात ग्रामीण भागासह जळगाव, नगर, धुळे नंदुरबार आदी भागातील रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. रुग्ण ज्या ठिकाणी दगावतो त्या ठिकाणी किंवा त्याच शहरात जवळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे, असा नियम आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा अधिक दिसत सल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.

हेही वाचा: "खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले" गिरीश महाजन यांची टिका

महापालिकेने आकडेवारी जाहीर करावी : सीमा हिरे

महापालिका क्षेत्रात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होत आहे. काही दिवसांपासून महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्याचबरोबर रुग्णांचा मृत्यू संख्येतदेखील वाढ होत आहे. स्मशानभूमीतदेखील अंत्यविधीसाठी जागा मिळत नसून रुग्णांच्या नातेवाइकांना तासनतास वाट बघावी लागत आहे. शहरात १ ते २८ एप्रिलपर्यंत किती लोक मृत्युमुखी पडले याची आकडेवारी मिळावी, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.