Nashik News : 'त्या' महिलेचा मृत्यु पाण्यात बुडून? पोलिसांचा प्राथमिक अंदाज | delhi women died due to drowning in dam preliminary estimate of police nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News : 'त्या' महिलेचा मृत्यु पाण्यात बुडून? पोलिसांचा प्राथमिक अंदाज

Nashik News : 'त्या' महिलेचा मृत्यु पाण्यात बुडून? पोलिसांचा प्राथमिक अंदाज

Nashik News : नाशिकला फिरण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या विवाहितेचा मृतदेह गंगापूर धरणात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, पतीसोबत एमटीडीसीच्या रिसोर्टमध्ये जेवण केल्यानंतर ती पतीला न सांगता बाहेर पडली.

धरणात तोल जाऊन वा पाण्यात उडी घेतल्याने तिचा मृत्यु झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, विवाहितेच्या माहेरच्या नातलगांनीही याबाबत कोणतेही आरोप न केल्याने याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसात अकस्मात मृत्युचीच नोंद करण्यात आलेली आहे. (delhi women died due to drowning in dam preliminary estimate of police nashik news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिती हरेंद्रसिंग राठोड (वय २८, रा. मध्यप्रदेश, मूळ रा. दिल्ली) असे मृत विवाहितेचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा विवाह कौटुंबिक रितीरिवाजानुसार झाला होता.

त्यानंतर ते नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक देवदर्शन केल्यानंतर गडकिल्ल्यांवर फिरायलाही गेले होते. उपनगर परिसरात ते वास्तव्याला होते. दरम्यान, गेल्या शुक्रवारी (ता.२९) दोघे एमटीडीसीच्या रिसोर्टवर जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर आदिती पतीला न सांगता बाहेर पडली.

त्यावेळी धरणालगत तिचा पाण्यात तोल गेला असावा अथवा तिने आत्महत्त्येच्या उद्देशाने पाण्यात उडी घेतली असावी. त्यात तिचा मृत्यु झाला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पतीने तिचा परिसरात शोध घेतल्यानंतर उपनगरमध्ये वास्तव्याला असलेले हॉटेल गाठले. रात्री उशिरापर्यंत ती न सापडल्याने त्याने उपनगर पोलिसांना आदिती बेपत्ता असल्याची खबर दिली. त्यानुसार नोंद करण्यात आली.

तसेच, सदरची माहिती त्याने कुटूंबियांना कळविली. आदितीचे शवविच्छेदन केले असता, तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत. तसेच तिचा मृत्यु पाण्यात बुडाल्याने झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकार्यांनी काढला आहे. आदितीचा भाऊ अखिल राठोड याने मृतदेहाची ओळख पटविली. याप्रकरणी तिच्या माहेरच्या नातलगांनी कोणताही दावा केलेला नाही. त्यामुळे नाशिक तालुका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आलेली आहे.