तीन सजांमुळे तलाठ्यांची दमछाक; शेतकऱ्‍यांच्या महत्त्वाच्या कामांवर परिणामामुळे नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

talathi-office_201906247492.jpg

वाढती लोकसंख्या, अपूर्ण तलाठी सजा यामुळे महसूल विभागाचा कामाचा व्याप वाढत आहे. यासाठी वाढीव तलाठी सजेच्या संख्यावाढीचा निर्णय राज्य शासनाने ऑगस्ट २०१७ मध्ये घेऊन नवीन विष्णूनगर तलाठी सजा मंजूर केली.

तीन सजांमुळे तलाठ्यांची दमछाक; शेतकऱ्‍यांच्या महत्त्वाच्या कामांवर परिणामामुळे नाराजी

विंचूर (नाशिक) : शेतकऱ्यांसाठी तलाठी कार्यालय हे अतिशय महत्त्वाची सेवा देणारे कार्यालय आहे. शेतजमिनीच्या महसूल कामकाजाचे गावपातळीवरील कामकाज तलाठी करीत असून, विविध कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जावे लागते. मात्र, येथील महसूल सजातील कामगार तलाठी यांच्याकडे चौदा हजार सात-बारा उतारे व तीन सजेचा कारभार दिल्याने कामाचा अतिरिक्त ताण वाढून तलाठ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांच्या इतर महत्त्वाच्या कामावर याचा परिणाम होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

एका सजावर एका तलाठ्याची नियुक्ती करावी

वाढती लोकसंख्या, अपूर्ण तलाठी सजा यामुळे महसूल विभागाचा कामाचा व्याप वाढत आहे. यासाठी वाढीव तलाठी सजेच्या संख्यावाढीचा निर्णय राज्य शासनाने ऑगस्ट २०१७ मध्ये घेऊन नवीन विष्णूनगर तलाठी सजा मंजूर केली. त्यामुळे एका तलाठी सजेवर अनेक गावांचा भार असल्याने तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होऊन नागरिकांची होणारी गैरसोय थांबेल, अशी आशा नागरिकांमध्ये वर्तवण्यात येत होती. परंतु असे न होता एक सजा असलेल्या तलाठ्यावर आणखी दोन सजांचा अतिरिक्त भार दिल्याने तलाठ्यांची काम करण्यास चांगलीच फरपट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाही. नवीन मंजूर विष्णूनगर सजावर तसेच इतर सजांवर लवकरात लवकर तलाठ्याची नियुक्ती करून एका सजावर एका तलाठ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

विंचूर कामगार तलाठी यांची 
नियुक्त असलेली सजा व गावे 

विंचूर सजा- विंचूर, हनुमाननगर, किसनवाडी. 
निमगाव वाकडा सजा- निमगाव, पाचोरे बुद्रुक, पाचोरे खुर्द, शिवापूर, ब्राह्मणगाव विंचूर, 
विष्णूनगर सजा- विष्णूनगर, सुभाषनगर, विठ्ठलवाडी. 

हेही वाचा >  मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

नवीन सजा मंजूर झाल्याने विंचूर तलाठ्यांचा भार कमी होईल, असे वाटत होते; पण उलट इतर सजेचा अतिरिक्त भार येथील तलाठ्यावर दिल्याने कामे रखडत आहेत. त्यामुळे शासनाने नवीन सजा मंजूर करूनही काहीच फायदा झाला नाही. - ज्ञानेश्वर भडांगे, शेतकरी, हनुमाननगर 


सजा पुनर्रचनेमुळे नवीन सजानिर्मिती झाली आहे. मात्र नवीन सजेवर कर्मचारी भरती न झाल्यामुळे त्या सजेचा अतिरिक्त कारभार दुसऱ्या तलाठ्याकडे सोपवला आहे. - सागर शिर्के, कामगार तलाठी, विंचूर सजा  

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

loading image
go to top