Summer Business : सिन्नरला उन्हाळ्यामुळे गरिबांच्या फ्रिजला मागणी! 200 ते 350 रुपयांपर्यंत माठ उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Matka Seller

Summer Business : सिन्नरला उन्हाळ्यामुळे गरिबांच्या फ्रिजला मागणी! 200 ते 350 रुपयांपर्यंत माठ उपलब्ध

सिन्नर (जि. नाशिक) : मार्च-एप्रिल व मे या तीन महिन्यांत तापमानात प्रचंड वाढ झालेली असते. साधारणतः होळीनंतर तापमान वाढीला सुरवात होते. त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे गरिबांचा फ्रीज अशी ओळख असलेल्या माठांनाही मागणी वाढली आहे.

बाहेरील राज्यातून माठ विक्रीसाठी आले असून, स्थानिक कारागिरांनी स्वतः बनवलेले माठ विक्रीसाठी महामार्गावर, आठवडे बाजारात, शहरातील गंगावेस भागातील कुंभार भट्टीवर विक्रीसाठी आले आहेत. (demand for matka due to summer Math at Sinnar available from 200 to 350 rupees nashik news)

सध्या ग्रामीण भागातही घरोघरी फ्रीजची संख्या वाढली असली तरी माठातील पाणी पिणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. माठातले पाणी शरीरास उपायकारक ठरते. बाहेरील राज्यातून आणलेले माठ विक्रेते डोक्यावर घेऊन शहरी तसेच ग्रामीण भागांत विक्रीसाठी फिरताना दिसत आहेत.

तसेच सिन्नर शहर तसेच ग्रामीण कुंभारवाड्यातही फेरफटका मारला तर माठांच्या मोठ्या मागणीचा प्रत्यक्ष प्रत्यय या उन्हाळी हंगामात येत असतो.

कुंभारवाड्यात डिसेंबरपासूनच माठ बनविण्याचे काम सुरू होते. हे माठ बनविण्यासाठी माती आणली जाते. त्यानंतर प्रक्रिया केली जाते. त्यामधून आकर्षक माठ बनविले जातात. परंपरेपासून कुंभार व्यवसाय करत असल्याचे व्यावसायिक सांगतात.

वर्षभर मागणीनुसार कामे सुरू असतात. सध्या उन्हाळा सुरू असल्याने मातीच्या माठाची विक्री ते करीत आहेत. २०० ते ३५० रुपयापर्यंत माठ उपलब्ध आहेत. पूर्वी कुंभारवाड्यातच माठ बनविले जायचे.

ग्रामीण भागातील पारंपरिक व्यवसाय हा माठ बनवण्याचा असल्याने अनेक जण माठ बनवत असतात. घरोघरी फिरून माठ विक्री केली जाते, अशातच अनेक कुटुंबीय या व्यवसायवर उदरनिर्वाह करतात.

नक्षीकाम केलेल्या माठांना मागणी

यंदा नक्षीकाम केलेले माठ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. अनेक माठांना नळही बसविण्यात आलेले असतात. यात बाहेरील विक्रीतेही ग्रामीण भागात माठ घेऊन विक्री करीत आहेत.

थंडगार पाणी देणारे माठ घेण्याकडे अनेकांचा ओढा असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. उन्हाळ्यात माठाच्याही विक्रीत वाढ होत आहे. माठाच्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या असल्याने त्यांची विक्री जास्त होते.

"नैसर्गिक गार असलेले थंडगार माठातील पाणी शरीरासाठी उपायकारक असल्याने आम्ही सर्व कुटुंबीय वर्षानुवर्ष माठातील थंडगार पाणी पीत असतो. यामुळे शरीराला अपायकारक काही गोष्टी होत नाही. वातावरणानुसार माठातील पाणी तयार होत असते. हे पाणी पिल्याने लागलेली तहान ही नक्कीच भागली जाते. शरीरासाठी योग्य ते घटक या नैसर्गिक पाण्यातूनच मिळत असतात."- रेवती तिकोणे, गृहिणी