
Summer : उन्हाचे चटके लागताच माठांना मागणी वाढली; रंगीबेरंगी नक्षीदार माठांना महिलांकडून पसंती
नरकोळ : उन्हाळ्यात लागणारी तहान भागविण्यासाठी माठातील पाणी सर्वोत्तम मानले जाते. त्यामुळेच उन्हाळ्याची चाहूल लागताच माठ विक्रीसाठी बाजारात सज्ज झाले आहेत. यंदा मध्यप्रदेश, गुजरात, राज्यातून काळा लाल व मातीपासून बनवलेले सर्वांचे लक्ष वेधून घेणारे नक्षीदार माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या माठांना महिलांकडून पसंती दिली जात आहे.
गरिबांचे फ्रीज म्हणून माठांना संबोधले जाते. पाणी हे आरोग्यदायी असते, दिवसातून किमान दहा मोठे ग्लास पाणी गरजेचे असते. वैद्यकीय सल्ल्यातही पाण्याला महत्त्व दिले जाते. उन्हाळ्यात पाणी प्या म्हणून सांगण्याची गरज भासत नाही.
इतकी वारंवार तहान लागत असल्याने पाणी पिणे अनिवार्य ठरत असते. त्यात उन्हामुळे इतर भांड्यात साठवून ठेवलेले पाणी गरम असल्याने तहान भागत नाही. माठातील पाणी आरोग्यदायी असते. हे पाणी उन्हाळ्यात हमखास पिण्याचा सल्लाही दिला जातो.
माठ बनविण्यासाठी काळ्या रंगाच्या मातीचा वापर केला जातो. पाणी जास्तीत जास्त थंड ठेवण्याचे या मातीचे वैशिष्ट्य आहे. लाल रंगाच्या मातीपासून लाल माठ बनविण्यात येतात. यातील पाणी थंडच असते.
असे आहेत माठाचे दर
मोठा नक्षीदार माठ - ४०० रुपये
लहान - २५० पासून पुढे
काळा माठ - मोठा २०० ते ३५० रुपये
लाल माठ - मोठा-३५० रुपये, लहान- १५० ते ३०० रुपये
येथून येतात माठ
मातीचे नक्षीदार माठ - गुजरात (ठाण)
काळा माठ- मध्यप्रदेश (धाननोत)
लाल माठ - मध्यप्रदेश (बेतून)
''अवकाळी पावसामुळे उन्हाळा ऋतू सुरू होऊनही ग्राहक येत नसल्याने काळजी वाटत होती परंतु सध्या कडक उन्हामुळे व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाला अक्षयतृतीया सणापर्यत माठांना मागणी असते. नक्षीदार माठ लक्ष वेधून घेत आहेत.'' - सुशील पाल, माठ विक्रेता, सटाणा