
Dada Bhuse News: पालकमंत्री भुसे यांनी केलेला विकास विरोधकांच्या डोळ्यात खुपतो - नीलेश आहेर
मालेगाव : शहर व परिसराने विविध विकास कामांच्या दृष्टीने कात टाकली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त (६ मार्चला) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० कोटींचा निधी शहरासाठी उपलब्ध करून दिला होता.
त्यानुसार ३ महिन्यांपूर्वी सदर कामांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाला होता. यातील पाच कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. ही विकासकामे विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप माजी उपमहापौर नीलेश आहेर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
श्री. आहेर यांनी पत्रकात स्टेट बँक कॉर्नर ते वैद्य हॉस्पिटल, सटाणा रोड, सूर्यवंशी लॉन्स ते कृषीनगर, डॉ. सावंत हॉस्पिटल ते व्हरायटी कॉर्नर, संत रोहीदास चौकपर्यंतची कामे पूर्ण झाली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वार ते महात्मा ज्योतीबा फुले पुतळा, चर्चगेट ते तलाठी ऑफीस कॅम्प येथील कामे प्रगतिपथावर आहेत. यापूर्वी ही कामे सुरु करणेकामी हेच विरोधक सोशल मिडियाच्या माध्यमातून कामे होत नाही म्हणून ओरडत होते. कामे मार्गी लागताच त्यांनी कोल्हेकुई सुरु केली आहे.
शहरात प्रगतिपथावर असलेल्या कामांना जिल्हाप्रमुख संजय दुसाने, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, उपजिल्हाप्रमुख सुनील देवरे, प्रमोद पाटील, संदीप पवार, भीमा भडांगे, सुनील सोनवणे, सतीश सुराणा, महेश लोंढे आदी पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.२५) प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सामान्य नागरिकांनी या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करतानाच श्री. भुसे यांचे आभारही मानले आहे.
कोण दिशाभूल करतेय मालेगावकरांना माहितेय
मंजूर कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजनातून ५० कोटी व नगरविकास विभागामार्फत ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पालकमंत्री भुसे यांनी कोणत्याही प्रकारचा व्यक्तिद्वेष जर बाळगला असता तर शहरातील एकात्मता चौक ते कॉलेज स्टॉपपर्यंत रस्ता रुंदीकरणासह दुभाजक व पथदिवे हे काम पूर्ण झालेले दिसून आले नसते. कोण खड्डे खोदत आहे, कोण विकासकामे करीत आहे व कोण जनतेची दिशाभूल करीत आहे हे मालेगावची सुज्ञ जनता जाणून आहे.