Dinesh Kumar Bagul Case : लाचखोर बागूल यांची खाती, लॉकर्स होणार ‘Freeze’ | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe Crime News

Dinesh Kumar Bagul Case : लाचखोर बागूल यांची खाती, लॉकर्स होणार ‘Freeze’

नाशिक : आदिवासी विकास विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावे असलेली बँक खाती व लॉकर्स गोठविण्यासाठी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई सुरू झाली आहे. चौकशीमध्ये बागूल सहकार्य करीत नसले तरीही ‘लाचलुचपत’ने तपासामध्ये बागूल यांच्याकडे त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील देवगाव येथे जमीन असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे बागूल यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भात त्यांच्या मालमत्तेची खुली चौकशी होणार असून, गुन्हा दाखल करण्याची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे मागितली आहे. (Dinesh Kumar Bagul Bribery Case Accounts lockers will be Freeze Nashik crime Latest Marathi News)

आदिवासी विकास विभागाचे लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांना शुक्रवारी (ता. २६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. बागूल सध्या लाचलुचपतच्या कोठडीत आहेत. चौकशीमध्ये बागूल असहकार्य करीत असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपास पथकाला अडथळे येत आहेत.

तरीही तपासी पथकाने लाचखोर बागूल यांच्याकडे त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात देवगाव परिसरात जमीन असल्याचे शोधून काढले आहे. त्याचप्रमाणे, पुणे व धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यातही बागूल यांची स्थावर मालमत्ता असण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यादृष्टीने पथक तपास करीत आहे.

त्याचप्रमाणे, लाचखोर बागूल व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या बँक खात्यांबाबत कोणतीही माहिती देत नसल्याने ‘लाचलुचपत’च्या पथकाने नाशिक, पुणे व धुळ्यातील बँकांमध्ये असलेली बँक खाती व लॉकर्स गोठविण्यासंदर्भातील पाठपुरावा केला आहे.

तसेच, स्थावर मालमत्तेचाही शोध घेतला जात आहे. याबाबत दोन दिवसांत ठोस माहिती तपास पथकाच्या हाती लागण्याची शक्यता आहे. यामुळे बागूल यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्या मालमत्तेची खुली चौकशी होणार असून, गुन्हा दाखल करण्याची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे मागितली आहे.

हेही वाचा: भाटगाव येथील 2 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

पासपोर्ट जमा; कागदपत्रे जप्त

लाचखोर बागूल यांच्या निवासस्थानी छाप्याच्या वेळी फेकलेल्या बॅगेतून काही कागदपत्रे आणि पासपोर्ट तपास पथकाच्या हाती लागले. बागूल यांच्याविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भात त्यांच्या मालमत्तेची खुली चौकशी होणार असून, गुन्हा दाखल करण्याची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासनाकडे मागितली आहे.

कागदपत्रांची शहानिशा केली जात असून, पासपोर्ट पथकाने जमा केला आहे. तसेच स्थावर मालमत्तेसंदर्भात उपनिबंधक कार्यालयाकडेही पथकाकडून पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती ‘लाचलुचपत’चे अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली.

निलंबनाबाबत साशंकता

लाचखोर बागूल यांना हरसूल येथील सुमारे अडीच कोटींच्या सेंट्रल किचनच्या कार्यारंभ आदेशासाठी २८ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने अटक केली. सध्या लाचलुचपतच्या कोठडीत असलेले बागूल यांना गुन्हा दाखल होऊन चार दिवसांचा कालावधी उलटूनही निलंबित करण्यात आलेले नाही. त्यामुळे आदिवासी विकास विभागात साशंकता व्यक्त होते आहे.

हेही वाचा: सेवानिवृत्तीनिमित्त आदिवासी कार्यालयातच जेवणावळी!; अभ्यागत राहिले ताटकळत

Web Title: Dinesh Kumar Bagul Bribery Case Accounts Lockers Will Be Freeze Nashik Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..