NMC: बोटचेपे भूमिका अधिकाऱ्यांना महागात पडणार? धोकादायक इमारती खाली करण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर | Divisional authorities responsible for demolishing dangerous buildings nashik nmc news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest News

NMC: बोटचेपे भूमिका अधिकाऱ्यांना महागात पडणार? धोकादायक इमारती खाली करण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर

NMC : पावसाळा आला की धोकादायक वाडे व इमारतींना नोटिसा पाठवून सोपस्कार पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना आता अशा प्रकारची बोटचेपे भूमिका अधिक महागात पडणार आहे. त्याला कारण म्हणजे इमारतींचे सर्वेक्षण करून नोटिसा पाठविण्याबरोबरच धोकादायक इमारती खाली करून घेण्याची जबाबदारी आता विभागीय अधिकाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे.

तसे न झाल्यास निलंबनासह थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. (Divisional authorities responsible for demolishing dangerous buildings nashik nmc news)

नाशिक महापालिकेची हद्द २५९ चौरस किलोमीटरची आहे. यामध्ये जवळपास ३१ गावठाणे असून, या गावठाणामध्ये जुन्या इमारती व वाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे नवनगरांमध्येदेखील चाळीस वर्षांपेक्षा अधिक इमारतींची संख्या वाढत आहे.

गावठाणातील वाडे व इमारती दुरुस्तीच्या पलीकडे गेले आहे. तर, नवनगरांमधील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून वापरण्यायोग्य प्रमाणपत्र मिळाल्यानंतर वापरात येणे शक्य आहे. गावठाणामध्ये पावसाळ्यात मोठ्या दुर्घटना घडतात.

यातून वित्त व जीवितहानी होते. महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून धोकादायक वाडे व इमारतींना नोटिसा पाठवल्या जातात. एकदा पावसाळा झाल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे- थे होते.

मात्र, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या धोका कायम राहतो. मागील वर्षी तत्कालीन आयुक्त रमेश जाधव यांनी तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारती व वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या व धोकादायक इमारती व वाड्यांमधील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या.

आयुक्त पुलकुंडवार यांनीदेखील धोकादायक मालमत्ता संदर्भात दक्षता घेताना १०७७ वाडे व इमारतींची संयुक्त पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांसह विभागीय अधिकाऱ्यांनी धोकादायक इमारती व वाड्यांमधील घरमालक व भाडेकरूंशी चर्चा करून धोकादायक इमारती उतरून घेण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम २६८ नुसार पोलिसांच्या मदतीने धोकादायक इमारती उतरवून घेण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. धोकादायक भाग कोसळून हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

विभाग धोकादायक घरे व वाडे

पश्चिम ६००
पंचवटी १९८
पूर्व ११७
नाशिकरोड ६९
सातपूर ६८
सिडको २५
-------------------------------------
एकूण १,०७७