डॉक्‍टर, अभियंत्यांप्रमाणे घडावे खेळाडू ; राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी

एसएसके वर्ल्ड क्‍लबमध्ये अर्जुन पुरस्‍कार, शिवछत्रपती पुरस्‍कारार्थींचा गौरव
राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी
राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी sakal

नाशिक : ज्ञानार्जनासाठीही आधी सुदृढ व्‍हावे लागते, हा संदेश स्‍वामी विवेकानंदांनी जगाला दिला. आपल्‍याकडे मुलांना डॉक्‍टर, इंजिनिअर घडविण्याकडे ालकांचा भर असतो. परंतु थोडी बचत करत व आपल्‍या पाल्‍याच्‍या क्षमता ओळखून विविध क्रीडा प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविताना देशाचा नावलौकिक उंचावावा, असे आवाहन राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी शनिवारी (ता. ९) केले.

पाथर्डी गाव येथील दी एसएसके वर्ल्ड क्‍लब येथे यशोकीर्ती पुरस्‍कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. नाशिकमधील अर्जुन पुरस्‍कार व शिवछत्रपती पुरस्‍कार विजेत्‍यांचा सत्‍कार या वेळी झाला. पालकमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, दी एसएसके वर्ल्डचे प्रमुख शैलेश कुटे, डॉ .राजश्री कुटे आदी उपस्‍थित होते.

राज्‍यपाल कोश्‍यारी म्‍हणाले, की नाशिक मुंबई, पुण्यापेक्षाही आघाडीवर आहे. या भूमीचे धार्मिक महत्त्व, तसेच विविध क्षेत्रांतील योगदान पाहता नेतृत्ची संधी ध आहे. भूतकाळाचा गर्व करावा, परंतु भविष्यालाही गर्व करण्यायोग्‍य बनविले पाहिजे. नव्‍या युगात जात असताना, या नव्‍या भारतात खेळाडूंना अनन्‍यसाधारण महत्त्व असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

श्री. कुटे म्‍हणाले, की कोरोनाच्या काळात सर्वकाही ठप्प असतांना, या क्रीडासंकुल उभारणीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. शासन पुरस्‍कारप्राप्त खेळाडूंचा सत्‍कार या वास्‍तूत घडावा, अशी इच्‍छा होती. ही इच्‍छा आज पूर्ण होते आहे. नाशिकसारख्या ठिकाणी आर्यनमॅन स्‍पर्धा होण्यासाठी शासन स्‍तरावर पुढाकार घेण्याची मागणी यानिमित्त केली.

व्‍यासपीठावर रंगले कबड्डीचे डावपेच

दरम्‍यान, कार्यक्रमानिमित्त व्‍यासपीठावरच कबड्डीचे डावपेच रंगले. माजी मंत्री विखे-पाटील म्‍हणाले, की केंद्र शासनाच्‍या प्रभावी क्रीडा धोरणामुळे अनेक खेळाडू घडले. परंतु राज्‍याकडे क्रीडा धोरण नाही. संकुलांची अवस्‍था बिकट असल्‍याची टीका त्‍यांनी केली. हा मुद्दा खोडून काढतांना विभागीय क्रीडासंकुलासाठी पन्नास लाख, जिल्‍हा क्रीडासंकुलासाठी पंचवीस तर तालुका क्रीडा संकुलासाठी पाच लाखांचा निधी शासनाने दिल्‍याचे नमूद केले. तसेच आम्‍ही कबड्डीचे चांगले खेळाडू असून, कुणाचा पाय कसा खेचायचा व उलटी, पलटी मारून कसे बसायचे आणि अचूक नेम कसा लावायचा हे आम्‍हाला चांगलेच जमते, अशी बोचरी टीका राज्‍यपालांवर केली. ज्‍याप्रमाणे खेळाडू या चुकांतून शिकतात, तसेच आम्ही शिकत असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले. तर मनोगताची सुरवात करताना राज्‍यपाल कोश्‍यारी म्‍हणाले, की ''भुजबल मेरेभी पालक हैं, मेरे बल भुजबल, सबके बल भुजबल'', असे म्‍हणताना ''पैर कैसे खिचना हैं, ये हम भी कबड्डीसे सिखे हैं, असे प्रतिउत्तर दिले. तर भाषणाच्‍या समारोपावेळी ते म्‍हणाले, की ''राजभवन मैं बेठें बेठें हम बोर हो जाते हैं, पर भुजबल हमे वहाँ मिलने आते नहीं, इस बहाने उनसे मुलाकात हो गयी'' असे म्‍हणत भाषणाचा समारोप केला.

क्रीडा क्षेत्रातही नाशिकची आघाडी : भुजबळ

नाशिकमध्ये धार्मिक पर्यटनासोबत बोट क्‍लबच्‍या रुपाने पर्यटनाच्‍या अन्‍य संधी उपलब्‍ध आहेत. येथे चांगली शैक्षणिक संकुले आहेत. क्रीडा क्षेत्रातही नाशिक मागे नसून, येथून अनेक खेळाडू घडले आहेत. निवडणूकीच्‍या वेळी जरी येथील नागरिक आपापल्‍या पक्षाचा झेंडा हाती घेतात. परंतु निवडणूक झाल्‍यावर पुन्‍हा सर्व एकत्र येत असल्‍याची येथील खासियत असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

यांचा झाला सत्‍कार...

अर्जुन पुरस्‍कार विजेती कविता राउत-तुंगार, दत्तू भोकनळ यांच्‍यासह शिवछत्रपती पुरस्‍कार प्राप्त नरेंद्र छाजेड, अशोक दुधारे, गोरखनाथ बलकवडे, आनंद खरे, अविनाश खैरनार, सुनील मोरे, साहेबराव पाटील, विजेंद्र सिंग, अंबादास तांबे, राजू शिंदे, शेखर भंडारी, श्रद्धा वायदंडे, नीलेश गुरळे, मोनिका आथरे, सचिन गलांडे, अस्‍मिता दुधारे, अजिंक्‍य दुधारे, डॉ.महेंद्र महाजन, डॉ.हितेंद्र महाजन, रोशनी मुर्तडक, संजय होळकर, श्‍यामा सारंग, सतीश धोंगडे, विष्णू निकम, राजेश गायकवाड, भक्‍ती कुलकर्णी, योगेश पटेल, लहानू जाधव, ज्ञानेश्‍वर निगळ, श्रृती वायदंडे, तनुजा पटेल, हंसराज पाटील, वैशाली तांबे, स्‍नेहल विधाते, श्रद्धा नालमवार, शरयू पाटील, संजीवनी जाधव, सतीश कडाळे, अक्षय देशमुख, पूजा जाधव, सुलतान देखमुख, किसन तडवी, सुर्यभान घोलप जाकृती क्षहारे, सायली पोहोरे, आर्या बोरसे, श्रेया गवांडे यांना पुरस्‍कार प्रदान केला. तर शैलजा जैन यांचा पुरस्‍कार त्‍यांचे पती आणि तुषार माळोदे व राजेंद्र सोनार यांचा पुरस्‍कार त्‍यांच्‍या पालकांनी स्‍वीकारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com