
Dr. Rajendra Singh : जगाच्या सनातन विकास पुनर्जीवनासाठी शिकावे लागेल पाणीदारचे पारंपारिक ज्ञान
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांनी जगातील नैसर्गिक आणि मानवी समुदायांवर विश्वास वाढवला पाहिजे, असे ठासून सांगत आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी जगाच्या सनातन विकास पुनर्जीवनासाठी पाणीदार होण्यासाठीचे पारंपारिक ज्ञान शिकावे लागेल, असे अधोरेखित केले. दुष्काळ आणि पूर लोक आयोगाच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात झालेल्या पहिल्या जागतिक जल परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते.
सध्या संयुक्त राष्ट्र सर्व जबाबदारी सरकारांवर आणि सरकार ही जबाबदारी संयुक्त राष्ट्र संघावर टाकत आहे. याच पार्श्वभूमीवर जल परिषदेत ठराव करण्यात आले. आम्ही सर्वजण मिळून पाणीदार होण्याचे काम करु आणि आपला समाज ठरवू हे संयुक्त राष्ट्रांनी ऐकले पाहिजे.
कारण संयुक्त राष्ट्र जगासाठी धोरण बनवते, असे सांगून डॉ. सिंह म्हणाले, की आयोग स्वेच्छेने जगातील लोकांचा अनुभव आत्मविश्वासाने समोर ठेवून न्यूयॉर्कचा ठराव केला. त्यामुळे एकीकडे विचार-तत्त्व अंगीकारण्याची स्वीकृती आणि दुसरीकडे कार्य करण्याचा आपला निर्धार सूचवतो.
मुळातच, बहुराष्ट्रीय कंपन्या सरकारांप्रमाणे औपचारिकपणे त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. त्याऐवजी आयोगाच्या ठरावानुसार पाणी, पृथ्वी, निसर्ग आणि मानवता या सर्वांनी एकत्र येऊन पाण्याचे संवर्धन करावे. शिवाय राज्य, सरकार, समाज, समूदाय, बहुराष्ट्रीय कंपन्या, संत, वैज्ञानिकांनी एकत्र येण्यातून जग जलमय होईल. साऱ्यांना एकत्रित करण्याची मोहिम संयुक्त राष्ट्रांनी सुरु करावी.
जगाला पाणीदार बनवायचे असल्यास सर्व शक्तीमान संयुक्त राष्ट्रांनी आपले हक्क आणि अधिकार समाजात समान वाटून द्यावेत. हे हक्क आणि अधिकार समाजात समानतेने पोचल्यास समाज सरकारांसारख्या मागण्या करणार नाही. आपली जबाबदारी समजून निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या कामात गुंतून जाईल. संयुक्त राष्ट्रांनी हे समजून घेतले पाहिजे की, जिथे जिथे समाजाने काम केले आहे, तिथे त्यांनी स्वतःला पाणीदार करून घेतले आहे. जगभर अशी लाखो उदाहरणे आहेत, असेही डॉ. सिंह यांनी सांगितले.
पूर-दुष्काळ मानवनिर्मित
आधुनिक तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शास्त्राने सरकारे चालवली जात आहेत. कारण सरकारचा विश्वास तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीवर आहे. हे शोषण, प्रदूषित आणि अतिक्रमण करणारे आहे. कारण पाण्यावर एवढे मोठे काम होत असताना पृथ्वी पूर आणि दुष्काळाची शिकार होत राहिली आहे.
ज्या तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या आधारे जगातील सरकारे आपल्या कामाचा आधार घेत आहेत, त्या आधारे निसर्गाचे पालनपोषण होत नाही, याचाच हा पुरावा आहे. त्यामुळे हा पूर-दुष्काळ झपाट्याने वाढत आहे. ते कमी नैसर्गिक, अधिक मानवनिर्मित आहे, याकडे डॉ. सिंह यांनी लक्ष वेधले.