खरिपासाठी पीककर्जाची बोंब! सरकारचा शेतकऱ्यांना ‘शॉक’

farmer
farmeresakal

नाशिक : लॉकडाउनमध्ये (lockdown) शेतमालाचे चार पैसे मिळणे मुश्‍कील झालेले असल्याने गेल्या १४ महिन्यांत शेतकरी आर्थिक विवंचनेत (farmer) गुरफटले आहेत. अशातच यंदा खरीप हंगामात पेरणी कशी करायची, असा गंभीर प्रश्‍न तयार झालेला असताना, खरीप हंगामाच्या नियोजनातून सरकारने शेतकऱ्यांना ‘शॉक’ दिलाय. (financial crisis) गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच अर्थपुरवठ्यामध्ये प्रचंड मोठी घट झालेली दिसतेय. (drop in financing targets)

पीककर्जाच्या घसरत चाललेला आलेख

जिल्हा बँका आर्थिक अडचणीत सापडलेल्या असताना राष्ट्रीय आणि खासगी बँकांकडून अर्थसहाय्य होत नाही, ही शेतकऱ्यांची ओरड तशी नवी नाही. त्यातच सरकारने पगाराची जिल्हा बँकांमधील खाती खासगी बँकांमध्ये वर्ग केल्याची खंत जिल्हा बँकांकडून मांडली जात आहे. मुळातच, उद्दिष्टापेक्षा २४ टक्क्यांनी गेल्या वर्षी कमी पीककर्ज वाटप झाले. गेल्या वर्षी ४५ हजार ७८५ कोटींचे, तर यंदा ४२ हजार ३३८ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे खरिपासाठीचे नियोजन आहेपण, नावीन्यपूर्ण योजनांचे कागदी घोडे नाचविण्यात पटाईत असलेल्या कृषी विभागाकडून पीककर्जासाठी अर्थसहाय्य मिळण्यातील अडचणी दूर होण्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे धगधगते वास्तव यंदाच्या खरिपाच्या अगोदर पुढे आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात पीककर्जाच्या घसरत चालेल्या आलेखाविषयी चर्चा का करावी वाटली नसावी, असा प्रश्‍न राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अर्थपुरवठ्यातील बोंबाबोंबमुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे करण्याची सरकारची इच्छा आहे काय, अशी सडकून टीका महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामासाठी ६२ हजार ४५९ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. हे पीककर्ज ५८ लाख ५३ हजार १९८ शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात ४७ हजार ९७२ कोटींच्या पीककर्जाचे वर्षभरात राज्यातील बँकांनी वाटप केले. त्यात ४५ हजार ७८५ कोटी खरिपाच्या उद्दिष्टापैकी ३४ हजार ६६९ कोटींचे पीककर्ज ४५ लाख ८० हजार शेतकऱ्यांना मिळाले.

farmer
अखेर अगंबाई सुनबाई मालिकेतील कलाकाराने मागितली माफी!

जिल्हा बँकांचे ४४ टक्के पीककर्ज वाटप

राज्यातील १२ टक्के शेतकऱ्यांना गेल्या महिन्यापर्यंत पाच हजार ९९ कोटींच्या पीककर्जाचे वाटप झाले आहे. जिल्हा बँकांनी गेल्या आठवड्यापर्यंत नऊ लाख २९ हजार शेतकऱ्यांना १३ हजार ९२३ कोटी उद्दिष्टापैकी सहा हजार ९१ कोटी म्हणजेच, ४४ टक्के पीककर्ज वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली. जिल्हा बँकांना यंदाच्या आर्थिक वर्षात १८ हजार ६८८ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्या महिन्यापर्यंत यंदाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २८ हजार ५६३ कोटी अन्‌ खरिपाच्या २१ हजार १२९ कोटींपैकी खरिपासाठी ६६० कोटींचे (३ टक्के), खासगी क्षेत्रातील बँकांनी सहा हजार ३७२ कोटी यंदाच्या आणि खरिपाच्या चार हजार ४७१ कोटींपैकी २१० कोटी (५ टक्के), प्रादेशिक ग्रामीण बँकांनी यंदाच्या तीन हजार ४५२ व खरिपासाठीच्या दोन हजार ७५७ कोटींपैकी २१० कोटी (८ टक्के) पीककर्जाचे वाटप केले आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने बँकिंग क्षेत्राने केलेल्या पीककर्ज वाटपाची ही ‘लिटमस टेस्ट’ मानल्यास यंदाच्या खरिपामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या पीककर्जाची स्थिती काय राहणार, याची कल्पना आल्याखेरीज राहत नाही. राज्यात गेल्या वर्षी खरिपाची १०४ टक्के पेरणी झाली होती. खरिपासाठी यंदा एक कोटी ५७ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्‍चित केले आहे. कोरोना विषाणू संसर्ग फैलावाच्या अनुषंगाने बँकांनी पीककर्जासाठी ऑनलाइन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना सरकारतर्फे करण्यात आली आहे. त्याचबरोबर किसान क्रेडिटकार्ड योजनेंतर्गत ९८ लाखांपैकी ८६ लाख कार्डे उपलब्ध करण्यात आली असून, उरलेली १२ लाख कार्डे देण्याची सुविधा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील पीककर्ज वाटपाची स्थिती

वर्ष उद्दिष्ट कोटींमध्ये प्रत्यक्ष वाटप (टक्केवारी) शेतकरी संख्या जिल्हा बँकांकडून वाटप व्यापारी बँकांचे वाटप

२०१७-१८ ५४, २२१ २५, ३१६ (४७) २१ लाख ७४ हजार ४२ टक्के ५८ टक्के

२०१८-१९ ५८,३३२ ३१,२३४ (५४) २२ लाख ७६ हजार ३८ टक्के ६२ टक्के

२०१९-२० ५९,७६६ २८,६०४ (४८) १९ लाख ५६ हजार ३८ टक्के ६२ टक्के

२०२०-२१ ६२,४५९ ४७,९७२ (७७) ३१ लाख ७१ हजार ३७ टक्के ६३ टक्के

---

० इन्फोबॉक्स (दोन)

२०२०-२१ मधील विभागनिहाय पीककर्ज

विभागाचे नाव उद्दिष्ट कोटींमध्ये शेतकरी खाते संख्या वाटप कोटींमध्ये (टक्के)

कोकण १,७१६ २,४३, ७३० १,३७७ (८०)

पश्‍चिम महाराष्ट्र ३०,९४३ २५,२६, ६७५ २५,०६२ (८१)

मराठवाडा १५,५२३ १७,६६, ८३८ ११,५१६ (७४)

विदर्भ १४,३७७ १३,१५, ९५६ १०,०१७ (७०)

एकूण ६२,४५९ ५८,५३, १९८ ४७,९७२ (७७)

---

० इन्फोबॉक्स (तीन)

नाबार्डचा शेतीसाठीचा पतपुरवठा (आकडे कोटी रुपयांमध्ये)

* २०१९-२० : १,०२,२७७

* २०२०-२१ : १,१०,६४०

* २०२१-२२ : १,२७,३३८

(जिल्हा बँकांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे नाबार्ड फेरकर्ज उचल ६३२ कोटी आणि अतिरिक्त फेरकर्जाची उचल चार हजार ७०६ कोटींची घेतली)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com