
Water Crisis: उद्भव कोरडे पडल्याने पाणीयोजना बंद! राजापूरला पावसाळ्यात हाल, गावासह वस्त्यावर टॅंकरने पुरवठा
Nashik Water Crisis : राजापूरकर आणि पाणीटंचाई हे समीकरण वर्षानुवर्ष तसेच आहे. या वर्षी तर भर पावसाळ्यात लोशिंगवे व वडपाटी येथील पाणी योजनांच्या विहिरी कोरड्या झाल्याने योजना बंद पडल्या आहेत. परिणामी, गावाला प्यायला पाणी मिळेनासे झाले आहे.
सध्या एका टँकरवरच गावाची तहान भागवली जात असून, पाण्यासाठी नागरिकांना वाड्यावस्त्यावर भटकंती करण्याची वेळ आली आहे. (drought water scheme closed Rajapur condition during monsoon supply by tanker to village and settlement nashik)
कितीही प्रयत्न करा? नशीब फाटकं असले, की या प्रयत्नांना नेहमीच अपयश येते, असाच काहीसा अनुभव अवर्षणप्रवण व दुष्काळी राजापूरकर पाणीटंचाईबाबत वर्षानुवर्षे घेत आहेत. मागील ४०-५० वर्षांत गावाला तब्बल सहा पाणीपुरवठा योजनांचे भाग्य लाभले.
मात्र, उन्हाळ्यात योजना माना टाकून पडतात आणि गावकऱ्यांना थेंबभर पाण्यासाठी पुन्हा वणवण गावकुसाबाहेर भटकावे लागते. काही कुटुंबात दुसरी, तर काहींची तिसरी पिढीच्या नशिबी पाणीटंचाईचा प्रश्न चिटकून आहे.
उंच डोंगरी भागातील राजापूर गाव वर्षानुवर्षे दुष्काळाच्या खाईत लोटले आहे. या वर्षी सुरवातीपासून अत्यल्प पाऊस झाल्याने पिकांची राखरांगोळी झालीच, पण थोडेफार पाणी असलेले जलस्रोतही भर पावसाळ्यात कोरडे होत आहेत.
मागील महिन्यापासून लोहशिंगवे येथील पाणीयोजनेची विहीर व कूपनलिका कोरडी झाली असून, दुसरी पाणी योजना वडपाटी येथून आहे.
मात्र, तेथील विहीरही कोरडी झाल्याने पाणीयोजनेसाठी पाणीच उपलब्ध नाही. परिणामी, मागील २० ते २५ दिवसांपासून गावची पाणीपुरवठा योजना कोमात गेली आहे.
एप्रिलपासून वस्त्यांसाठी दोन टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर गावासाठी योजना बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल थांबवण्यासाठी माजी सरपंच सुभाष वाघ, भाजपचे नेते दत्ता सानप, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर दराडे व सदस्यांनी प्रयत्न करून प्रशासनाकडून गावासाठी टँकर मिळविला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनीही यासाठी मदत केल्याने रोज ४० हजार लिटरचा टँकर गावाला पाणीपुरवठा करीत आहे, हे पाणी नळयोजनेद्वारे शक्य तेवढ्या ग्रामस्थांना पुरविण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीमार्फत सुरू आहेत.
वाड्या-वस्त्यांसाठी रोज दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, मोठे गाव असल्याने गावांसह वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांचे हाल सुरू असून, खेपा वाढविण्याची मागणी होत आहे.
गावातील हातपंपांनी माना टाकल्याने ग्रामस्थ हंडे व ड्रम घेऊन मिळेल त्या वाड्यावर वस्तीवर जाऊन गरजेपुरत्या पाण्याची शोधाशोध करीत आहेत. शेतकऱ्यांचे विहिरी, बोअर आता पावसाळ्यात कोरड्या होत असल्याने टंचाईची धग अजूनच वाढत आहे.
"दोन्ही पाणीयोजनेचा उद्भव आटल्याने योजना बंद आहेत. केंद्रीय राज्य मंत्री भारती पवारांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी तत्काळ एक टँकर मंजूर केला आहे. गाव-वस्त्यांचा परिसर मोठा असल्याने टँकरची संख्या वाढवून मिळावी." -दत्ता सानप, भाजप नेते, राजापूर
"सर्वांत कमी पाऊस परिसरात पडल्याने अनेक खासगी व पाणी योजनांच्या विहिरींना थेंबभरही पाणी राहिलेले नाही. ग्रामस्थ मिळेल तिथून पाणी उपलब्ध करीत आहेत. सध्या टँकरचे पाणी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना दिले जात आहे. अजून टॅंकर सुरू करण्याची गरज आहे."
-सुभाष वाघ, सदस्य, राजापूर