
Water Pollution : वाढत्या जलप्रदुषणामुळे ‘गाव तिथे आरो प्लांट’! निफाड तालुक्यातील चित्र
Water Pollution : गोदावरी, तिच्या उपनद्या, तसेच नांदूर मधमेश्वर धरण, गोदावरी-पालखेड कालवे यांनी समृद्ध असणाऱ्या व संपूर्ण देशात द्राक्ष पंढरी असे बिरूद मिरविणाऱ्या निफाड तालुक्यात जलप्रदूषणाची धग मात्र कायम आहे.
वाढत्या जल प्रदूषणामुळे तालुक्यात आता गाव तिथे आरो प्लांट निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. (Due to increasing water pollution RO plant increasing Picture from Niphad taluka nashik news)
नाशिक जिल्ह्यातील समृद्ध तालुका म्हणून निफाडची ओळख आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत निफाड तालुक्यातील गोदावरीसह तिच्या उपनद्या, कालवे, तसेच पाण्याचे विविध स्रोतांची खस्ता हालत वाढत आहे.
शहरीकरणामुळे पाणी थेट नदीपात्रात येत असल्याने नद्यांची गटारगंगा झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नद्यांची अतिशय दयनिय परिस्थिती झाली आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेले पानवेलीचे साम्राज्य, त्यातून माणसाप्रमाणेच पशु-पक्ष्यांच्या अधिवासावर झालेला परिणाम, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांचे मात्र हाल होत आहेत.
काही वर्षांपूर्वी साध्या शेतातील दांडाचे पाणी, वाळाचे झऱ्याचे पाणी, पाटाचे पाणी प्यायला माणसं सहजच पुढे सरसावत असत. परंतु, निफाड तालुक्यातील जलस्त्रोतांच्या प्रदूषणामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून, त्याचा परिणाम म्हणून गाव तेथे आरो प्लांट निर्माण झाल्याचे चित्र सध्या तालुक्यात बघावयास मिळत आहे.
नद्या आणि उपनद्यांच्या पाण्याचा वापर केवळ कपडे, भांडे धुण्यासाठी आणि वापरण्यापूरताच मर्यादित झाला आहे. चांगल्या आरोग्यासाठी ग्रामस्थ आता आरोचे पाणी पिण्यासाठी वापरताना दिसतात. परंतु, हे पाणीदेखील कितपत योग्य आहे, याकडे बघण्यास कुणालाही वेळ नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नाशिक, नगरसह मराठवाड्याला झळ
निफाड तालुक्यातील गोदावरी नदीचे साधारणत: चाळीस किलोमीटरहून अधिक अंतरावरील पात्र, नांदूर मधमेश्वर धरण, त्या खालचे बंधारे या संपूर्ण क्षेत्रातील पाण्याला प्रदूषणाचा विळखा आहे.
या पाण्यावरच जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्य, तसेच शिर्डी, राहता, नगर, कोपरगाव, वैजापूर, सिन्नर, येवला, निफाडसह अनेक प्रमुख गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत.
या प्रदुषणाची धग नाशिक, नगर जिल्ह्यांसह मराठवाड्यातील गावांना निश्चितच सोसावी लागत आहे. त्यामुळे नद्यांच्या आरोग्याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे जाणकार सांगत आहेत.
"गेल्या काही वर्षांपासून गोदावरी, कादवासह अन्य तालुक्यांतील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण झाले आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष कृती योजना राबविण्याची गरज आहे."
-देवदत्त कापसे, माजी नगरसेवक, निफाड
"जल प्रदूषणामुळे नद्यांचे आरोग्य बिघडले आहे. पूर्वी माणूस नदीवर गेल्यास सहजच झऱ्याचे पाणी पिऊन तृष्णा भागवत असे. आता मात्र नद्यांमधील पानवेलींमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने, सर्वसामान्य नागरिकसुद्धा पिण्यासाठी आरोचे पाणी वापरत आहे. त्यामुळे नैसर्गिक पाण्याला तो निश्चितच मुकला आहे." -अनिरुद्ध प्रवार, दात्याने