esakal | पावसाअभावी भात रोपांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; धरणांनी गाठला तळ
sakal

बोलून बातमी शोधा

Water Crisis

पावसाअभावी भात रोपांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; धरणांनी गाठला तळ

sakal_logo
By
विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे यंदाचे वर्ष कसे जाणार, याची चिंता आता तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली आहे. भाताची रोपे पिवळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे टाकले आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील पूर्व भागात शेतकऱ्यांवर भाताच्या रोपांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. (Due to lack of rains farmers have to irrigate paddy plants by tankers)

तालुक्यात महिनाभरापासून पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीन, भात, भुईमूग, नागली, वरई, खुरासनी आदी पिके संकटात सापडली आहे. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील ऐन बहरात येणारी व आलेली भातशेती संकटात सापडली आहे. सध्या भाताच्या रोपांची वाढ खुंटली आहे. भातासह इतर रोपांना याकाळात पाण्याची अत्यंत आवश्यकता असते, मात्र पाऊसच गायब झाल्यामुळे भाताची रोपेदेखील पिवळी पडत असल्यामुळे भातशेती संकटात सापडली आहे. बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची प्रतीक्षा आहे.

भाताच्या रोपांचे नुकसान होऊ नये म्हणून नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करत रोपांना जीवनदान दिले आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील धरणांनीदेखील तळ गाठला आहे. दरम्यान, पावसाअभावी तालुक्यात काही भागात भाताची रोपे करपू लागली असून याचा परिणाम पुढील काळात होणाऱ्या उत्पादन क्षमतेवर घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला सरासरी ९७ टक्के पर्जन्यमान होईल, असा अंदाज वर्तवला होता. या आनंद वार्तामुळे बळिराजा सुखावला होता. त्यानुसार जून महिन्याच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावली, मात्र त्यानंतर जिल्ह्यातील चार ते पाच तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये अद्यापही दमदार पाऊस पडलेला नाही. सुरवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: नाशिक शहर बसचे लोकेशन एका क्लिकवर! नागरिकांमध्ये उत्सुकता

तालुक्यातील धरणांचा साठा :

धरण : दशलक्ष घनफूट : टक्केवारी

दारणा धरण : ३२४८ ४५.४३

भावली धरण : ६२५ ४३.५८

मुकणे धरण : १७७३ २४.९९

कडवा धरण : २३६ १३.९८

भाम धरण : १७८ ०७.२४

हेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गाने प्रवास करणार असाल तर बातमी तुमच्यासाठी

loading image