
SAKAL Exclusive : आडगाव ट्रक टर्मिनलमध्ये इलेक्ट्रिकल बस डेपो; सिटीलिंक ताफ्यात 25 बस
नाशिक : महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या ‘एन-कॅप’ योजनेतून २५ इलेक्ट्रिक बस खरेदीला मंजुरी दिल्यानंतर पुढील महिन्यात निविदा प्रक्रिया राबवून बस खरेदीची प्रक्रिया होणार आहे.
त्याचबरोबर इलेक्ट्रिक बससाठी आडगाव ट्रक टर्मिनल आवारात स्वतंत्र बस डेपो तयार केला जाणार आहे. या बस डेपोमध्ये इलेक्ट्रिक बससह खासगी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. (Electrical Bus Depot in Adgaon Truck Terminal Citylinc 25 buses nashik news)
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून ८ जुलैपासून शहर बससेवा सुरू केली. ‘ग्रॉस कॉस्ट कटिंग या तत्त्वावर दोनशे सीएनजी, पन्नास डिझेल बस सुरू आहे.
पर्यावरणपूरक धोरणाचा भाग म्हणून केंद्र सरकारच्या फेम- २ योजनेंतर्गत ५० इलेक्ट्रिक बस घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला. एका बससाठी ५५ लाख रुपये अनुदान अपेक्षित धरण्यात आले होते.
परंतु केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली नाही. एअर क्लीन मिशन (एन- कॅप) योजनेंतर्गत बसची संख्या घटवून ५० वरून २५ केली. केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. ‘एन-कॅप’ अंतर्गत हवा शुद्धीकरणासाठी महापालिका दर वर्षी २० ते २२ कोटी रुपये निधीतून इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या जाणार आहे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
‘एन-कॅप’ अंतर्गत निधी कमी असल्याने २५ इलेक्ट्रिक बस जीसीसी तत्त्वावर खरेदी करून सदरचे अनुदान हे थेट पात्र ठेकेदाराला दिले जाणार आहे. बस खरेदीसाठी सोमवारी (ता. १३) निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
स्वनिधीतून १०६ चार्जिंग स्टेशन
इलेक्ट्रिक बससाठी आडगाव ट्रक टर्मिनस जागेत स्वतंत्र बस डेपो उभारला जाणार आहे. बस डेपोमध्ये सिटीलिंकच्या इलेक्ट्रिक बससह खासगी इलेक्ट्रिक वाहनांसाठीदेखील चार्जिंग स्टेशन असतील.
ॲडमिनिस्ट्रेशन, चालक-वाहकांसाठी आराम कक्ष, कॅश कलेक्शन सेंटर असेल. शहरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढतं आहे. त्याअनुषंगाने चार्जिंग स्टेशनची निर्मिती केली जात आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका स्वनिधीतून १०६ चार्जिंग स्टेशन उभारणार आहे.