
Agriculture News: वांग्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याने केले मोफत वाटप
जळगाव नेऊर : वांग्याला मातीमोल भाव मिळत असल्याने व खर्चही निघत नसल्याने बाजार समितीत नेण्याचा खर्च करण्यापेक्षा जळगाव नेऊर येथील शेतकरी प्रवीण शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोफत वांगी वाटप केले. भाजीपाल्यालाही भाव मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित केला.
श्री. शिंदे म्हणाले, शनिवारी (ता.२५) सकाळी पाच कॅरेट वांगी येवल्याला नेले असता २० रूपये प्रती कॅरेटने व्यापाऱ्यांनी मागणी केली. येवल्याला जायला शंभर रूपयाचे पेट्रोल लागले. पाच कॅरेट विकून हाती शंभर रूपये येणार होते. त्यात शंभर रूपये पेट्रोलसाठी अगोदर खर्च केले होते.
हाती एक रूपया पण येत नसल्याने वांग्याची पाच कॅरेट येवल्याहून मुखेड येथे बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी पुन्हा दुचाकीत साठ रूपयाचे पेट्रोल टाकून मुखेडला आणले. मुखेडच्या बाजारात प्रती कॅरेट तीस रूपये प्रमाणे मागणी केली. हाती दीडशे रूपये येणार होते. त्यात जागा भाडे शंभर रूपये जाणार होते.
कुठलेच गणित जमत नसल्याने शेवटी प्रवीण शिंदे यांनी पाचही कॅरेट जशीच्या तशी घरी आणली व ग्रामपंचायतीसमोर मोफत वाटप केले. उरलेली वांगी जनावरांना टाकण्यासाठी वस्तीवर घेवून गेले. जळगाव नेऊर येथील शेतकरी प्रवीण शिंदे यांनी २० गुंठे क्षेत्रात पंचगंगा वांगी लागवड केली. यासाठी त्यांना जवळपास ६५ हजार रूपये खर्च झाला. केलेला खर्चही वसूल होणार नाही अशी परिस्थिती आहे.