
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने धास्तवला बळीराजा; हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरवला जाणार?
चांदवड (जि. नाशिक) :
बदलते नैसर्गिक चक्र, येतो अवकाळी पाऊस
सारेच पिके वाहून जाता, कष्ट केलेले वाया जातात !!
भयानक महापूर येतो, कित्येक जण बेघर होतात
विस्कळित दृश्य बघता, नयनी अश्रू तरळतात !!
पिकांसाठी कर्ज काढून, कठीण परिश्रम करतात
आर्थिक फटका बसता, गळा फास लावतात !!
कवितेच्या ओळीप्रमाणे आज शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. १३ मार्च ते १८ मार्च दरम्यान नाशिक जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पाऊस सांगितल्याने शेतकरी अवकळीच्या भीतीने धास्तावला आहे. हातात आलेले कांदे, द्राक्षे, गहु , हरभरा पीक व भाजीपाला वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (farmer scared by unseasonal rain nashik news)
जिल्ह्यात लाल कांदा काढणीला आला आहे. तर उन्हाळ कांद्याचे पीक जोमात आहे. शेतकरी पिकं काढण्यासाठी धावपळ करत असले तरी मजुरांअभावी काढणी रखडत आहे. शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, मका काढला असून पीक शेतातच ठेवले आहे.
तर काही शेतकऱ्यांची पिके काढण्यास वेळ आहे; परंतु गारपीट होण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी रब्बी हंगामातील पिके काढण्यासाठी लगबग करत आहेत. कांद्याला भाव नसल्याने अगोदरच शेतकरी हवालदिल आहे. आता काढणीला आलेल्या कांद्याला एकरी लाखापेक्षा जास्त खर्च झालेला आहे. तो वाया जाण्याच्या भीती वाढली आहे.
द्राक्ष उत्पादकांसमोर देखील अशीच भीती आहे. वर्षभराचे पीक असलेल्या द्राक्ष काढणीला आलेल्या आहे. तर काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना द्राक्षाचे प्लॉट दिलेले असून हार्वेस्टिंग सुरू आहे.
द्राक्षाला एकरी जवळपास अडीच लाख रुपये खर्च केलेला आहे. तर एकरी दिडशे ते दोनशे क्विंटल उत्पादन निघणार असताना पाऊस आला तर द्राक्षांना तडे जाण्याची भीती वाटते आहे. द्राक्षांना तडे जाण्याअगोदरच द्राक्षात पाहिलेल्या स्वप्नांनाच तडे गेले आहेत.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
गहू, हरभरा ही भुईसपाट होण्याच्या भीतीने शेतकरी भुईसपाट झाला आहे. उत्पादन वाढीसाठी कितीही नियोजन केले तरी अनियमित पावसामुळे शेतकरी अयशस्वी ठरत आहे.
गेल्या तीन वर्षात केवळ अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गतवर्षीही ऐन डिसेंबर महिन्यातच पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे दोन्ही हंगामातील तसेच फळबागांचेही नुकसान झाले होते.
२०२२-२३ रब्बी हंगामातील अंतिम कांदा लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
नाशिक - ११८४, इगतपुरी - ३४०, पेठ - १७७, त्र्यंबक - १२०, निफाड - १४७९१, सिन्नर- ११८५८,
येवला - २५२७८, चांदवड - १९२५५, मालेगाव - ३४६००, सटाणा - २१७३३, नांदगाव - १११२३
कळवण - २६१०९, दिंडोरी - २५१८, सुरगाणा - ४११, देवळा - २१३६३
"द्राक्ष बागा खूप मेहनत अन् मोठा खर्च करून जागवल्या आहे. बहुतांश द्राक्ष उत्पादकांचे द्राक्ष हार्वेस्टिंगला आलेले आहेत तर काहींचे हार्वेस्टिंग सुरू आहे. आता तर अवकाळीच्या भीतीने द्राक्षात पाहिलेल्या स्वप्नांना तडे गेले आहेत." - सुभाष शिंदे, संचालक कादवा कारखाना
"लाल कांद्याचा हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. कांद्यातून खर्चही निघाला नाही. तरी उन्हाळ कांद्याचे पीक उरावर दगड ठेवून खर्च करीत जोमात आणले. आता अवकाळीची शक्यता तर आमचं उरलं सुरलं सगळंच नेतं की काय असं वाटतंय." - पंकज दखणे, निमोण