Bacchu Kadu : तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी, मग तिकडे का गेलात? शेतकऱ्यांचा आमदार बच्चू कडू यांना प्रश्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Bachu Kadu while meeting Anil Borgude who protested by rotating rotor on onion crop

Bacchu Kadu : तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी, मग तिकडे का गेलात? शेतकऱ्यांचा आमदार बच्चू कडू यांना प्रश्‍न

नैताळे (जि. नाशिक) : येथील कांदा उत्पादक शेतकरी अनिल बोरगुडे यांनी कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने दोन एकर कांदा पिकावर दहा/ बारा दिवसांपूर्वी रोटर फिरवत सरकारचा निषेध व्यक्त केला.

नाशिकहून परतताना आमदार बच्चू कडू यांनी त्यांची येथे भेट घेत सात्वंन केले. त्यांच्याशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा, द्राक्ष निर्याती संदर्भात चर्चा केली.

‘भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, या गद्दारांबरोबर जायला नको होतं असा प्रश्‍न करून भाऊ विधानसभेत तुम्हीच शेतकऱ्यांची बाजू मांडून आम्हा द्राक्ष कांदा उत्पादकांना न्याय द्या अशी मागणी ही उपस्थित शेतकऱ्यांनी केली. (Farmers Question to MLA Bachu Kadu regarding joining to cm shinde group nashik news)

नैताळे येथील अनिल बोरगुडे यांनी दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरविला. कांद्याला मिळत असलेला कमी भाव व झालेला खर्च यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संतापून हे कृत्य केले होते.

त्यानंतर या शेतकऱ्याच्या शेतीला आमदार रोहित पवार, आमदार दिलीपराव बनकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबाशी मुक्तपणे संवाद साधला. कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहनही केले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत कांद्यावर बरेच मोठे आंदोलन केले.

विधानसभेत चर्चा घडवून आणली, यानंतर नाफेडणे शेतकऱ्यांच्या प्रोडूसर कंपन्यांमार्फत खरेदी सुरू केली आहे. राज्य सरकारच्या सत्ताधारी गटात असलेले आमदार बच्चू कडू यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात नैताळे येथे रात्री भेट दिली, त्या भेटीत कांदा पिकावर रोटर फिरविलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

आमदार बच्चू कडू यांनी संवादावेळी विद्यमान सरकारची पाठराखन केली. मात्र शेतकरी आपल्या पिकांना हमीभाव न मागता मजूरी म्हणून अनुदान मागू शकता असे ते म्हणाले, तेव्हा शेतकऱ्यांनी भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात. शेतकरी कष्टकरी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षाने बघतो. तुम्हीच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकता.

पण तुम्ही या गद्दाराबरोबर जायला नको होते असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी केला. तेव्हा त्या शेतकऱ्यांला स्थानिक ग्रामपंचायातीचे उदाहारण देऊन आमदार बच्चू कडू यांनी वेळ मारुन नेली. जगन काकडे, सागर निकाळे, विजय बोरगुडे, राहुल बोरगुडे, देविदास बोरगुडे, नितीन बोरगुडे, संदीप बोरगुडे, गौतम बोरगुडे, दत्तात्रेय भवर, सोपान बोरगुडे, सुनील बोरगुडे, संजय बोरगुडे आदीसह शेतकरी उपस्थित होते.