Farmer News: अवकाळी अन् गारपीटीनंतर बळीराजावर आश्वासनांचा पाऊस; नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

Farmer News: अवकाळी अन् गारपीटीनंतर बळीराजावर आश्वासनांचा पाऊस; नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

नैताळे : निफाड तालुक्यातील रानवड, पचकेश्वर, कुंभारी, रानवड यासह अनेक गावातील कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. उराशी बाळगलेले हिरवे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

खासदार, आमदार, मंत्री, अधिकारी आले. पंचनामे करण्याचे आदेश दिले पण नुकसानभरपाई किती व कधी मिळेल याचा खुलासा कोणीही केला नाही. लाखो रुपये खर्च केलेले भांडवल वाया गेले आहे.

काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने उत्पन्न बुडाले आहे. आता फक्त प्रतीक्षा नुकसान भरपाईची शेतकऱ्यांचे कोणीच वाली नाही बघता बघता गारा झाल्या वारा झाला अन् आश्वासनाचा पाऊसही झाला.

निफाड तालुक्यात द्राक्ष, कांदा, गहू, मका अशी अनेक नगदी पिके घेतली जातात जास्तीचा आर्थिक फायदा करून देणारे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर भांडवल खर्च करावा लागतो.

अवकाळी पावसाने निफाड तालुक्यात धुमाकूळ घातला होता. सारं होत्याचं नव्हतं झालं तालुक्यातील कुंभारी, देवपूर, पंचकेश्वर, रानवड ,वनसगाव, खडकमाळेगाव यासह अनेक गावात गारपीट झाली. सर्व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकरी खर्च कसा भरून काढायचा या विवंचनेत आहे.

आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, आमदार दिलीप बनकर माजी आमदार अनिल कदम यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन केले. अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेशही दिले. निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतीक्षाच करावी लागणार हे नक्कीच.. मदत लवकर मिळावी अशी मागणी कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहे.

''द्राक्षांसाठी पूर्वीपेक्षा वेगळा निकष लावून नुकसान भरपाई मिळायला हवी. द्राक्ष शेतीला लागणारे भांडवलाच्या काही प्रमाणात का होईना नुकसान भरपाईची रक्कम मिळायला हवी शिंदे-फडणवीस सरकारने याचा विचार करावा व द्राक्ष उत्पादकांना भरघोस मदत देऊन दिलासा द्यावा.'' -राजेंद्र बोरगुडे