
Accident News: नाशिक-चांदवड महामार्गावर भीषण अपघात; भाजपच्या नगरसेवकासह 4 जणांचा जागीच मृत्यू
नाशिक जिल्ह्यात चांदवड महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात धुळ्यातील भाजपचे नगरसेवकासह 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे.
या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
वडणेरभैरव पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले आहे. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता. अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे येथे चालले होते, ते धुळे जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
यामध्ये कृष्णाकांत चिंधा माळी, रा. राम मंदिर जवळ, मुपो- मोघन, ता जि- धुळे, किरण हरीचंद्र अहिरराव,(नगरसेवक धुळे) राहणार- धुळे, अनिल विष्णू पाटील, रा. अवधान, धुळे, प्रवीण मधुकर पवार- रा. अवधान, धुळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातामध्ये धुळ्याचे भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांचाही जागीत मृत्यू झाला आहे. कार नाशिककडून धुळ्याकडे जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांच्या अपघाती मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.